30 मे रोजी देशातील औषधी दुकानांचा एकदिवसीय संप

0

नवी दिल्ली। केंद्र सरकारने औषधांच्या विक्रीसंदर्भात लावलेले कडक नियम शिथील करावेत, या मागणीसाठी 30 मे रोजी देशातील सर्व औषधांची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टकडून हा एक दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे. औषध विक्रेत्यांच्या संघटनेच्या या निर्णयाचा मोठा फटका सर्वसामान्य लोकांना बसणार आहे. 29 मे रोजी रात्री 12 वाजता संपाला सुरुवात होणार आहे. देशातील सुमारे नऊ लाख औषध विके्रते ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टशी संलग्न आहेत. ‘अनेकवेळा आमच्या तक्रारी सरकारकडे मांडल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही, म्हणूनच आता संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टचे म्हणणे आहे. मेडिकलच्या या राष्ट्रव्यापी संपाची पूर्वसूचना पंतप्रधान कार्यालय, आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच औषध नियंत्रक कक्षात देण्यात आली आहे. 30 मे रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर सरकारच्या विरोधात निदर्शनसुद्धा केली जाणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून औषध विक्रेत्यांकडून त्यांना मिळत असलेले कमिशन वाढवून मिळण्याची मागणी होते आहे. औषध विक्रेत्यांना सध्या विक्रीवर 16 टक्के कमिशन दिले जाते आहे. हे कमिशन वाढवून द्यावे अशी मागणी केली जाते आहे. सरकार औषधांच्या दुकानांमध्ये नवीन सुविधा वाढवायला सांगते पण नव्या सुविधा देण्यासाठी खर्च जास्त होतो, या गोष्टींकडे दुर्लक्ष करतं असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.