30 लाखांचा गांजा जप्त : आयजी पथकाची दोंडाईचा शहरात कारवाई

दोंडाईचा : नाशिक आयजींच्या पथकासह स्थानिक दोंडाईचा पोलिसांनी 337 किलो वजनाचा व सुमारे 30 लाख रुपये किंमतीचा गांजा पकडल्याने खळबळ उडाली आहे. दोंडाईचा येथील मालपूर रोडवरील सदाअप्पा चाळीतील पाण्याच्या टाकीजवळील हर्षल सुरेंद्र पाटील यांच्या निवासस्थानाजवळ छोट्या वाहनातून (एम.एच.16-3352) गांजाची वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त माहिती आजींच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास सापळा रचून कारवाई केली मात्र संशयीत पसार झाले. त्यातील एकाची ओळख पटवण्यात यश आले आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
विशेष आयजींच्या पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहोम, सहायक निरीक्षक सचिन जाधव, सहायक उपनिरीक्षक बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, पोलिस नाईक प्रमोद मंडलिक, मनोज दुसाने, चालक पोलिस कॉन्स्टेबल सुरेश टोंगारे आदींसह सहायक पोलिस निरीक्षक एस. टी. लोले, उपनिरीक्षक दिनेश मोरे, हवालदार चंद्रकांत साळुंखे, नाईक विश्वेश हजारे, संदीप कदम, योगेश पाटील, अनिल धनगर यांच्या मदतीने चाळीत छापा टाकला मात्र सुगावा लागल्याने तीन संशयीत वाहन घेऊन पसार झाले. स्थानिक पोलिसांनी संशयीत नीलेश राजू मराठे (रा. शिवराय चौक, दोंडाईचा) याची ओळख पटवली.