मुंबई । मुंबईमधील झाडांची गणना करणार्या कंत्राटदार कंपनीला 30 लाख झाडांची गणना करण्यासाठी पालिकेने तब्बल 2 कोटी 86 लक्ष रुपये खर्च केले आहेत. कंत्राटदाराने तीनवेळा वाढीव कालावधी मागितल्यानंतर झाडांची गणना पूर्ण झाली आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बीएआरसी, व तिवरांचे क्षेत्र वगळून इतर विभागांतील झाडांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. जीआयएस व जपीएस तंत्रज्ञानावर आधार 21 लाख झाडांचे सर्वेक्षण करण्याचे कंत्राट मे. सार आयटी रिसोर्सेस प्रा. लि. ला फेब्रुवारी 2014 मध्ये देण्यात आले होते. प्रति झाड 9 रुपये 90 पैसे दराने 21 लाख झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी कंत्राटदाराला 15 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. दिलेल्या कालावधीत वृक्ष गणना पूर्ण न झाल्याने कंत्राटदाराला सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला.
या वाढीव कालावधीत ऑगस्ट 2015 पर्यंत 18 विभागात 21 लाख वृक्षांची गणना करण्यात आली होती. त्यानंतरही एच पूर्व, एच पश्चिम, टी, आर दक्षिण, आर मध्य, व आर उत्तर या सहा विभागातील अंदाजे 6 लाख झाडे मोजण्याचे काम मे 2016 मध्ये प्रति झाड 9 रुपये या दराने कंत्राटदाराल देण्यात आले होते. 6 विभागांतील 6 लाख वृक्षांची गणना करण्यासाठी 54 लाख रुपायांचे वाढीव कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतरही संरक्षण खात्याचा भूभाग, व्हीआयपी भूभाग व सरकारी कार्यालयांच्या भूभागावरील झाडांची गणना बाकी राहिली होती. मुंबईमधील सर्व झाडांची गणना करून एकत्रित अहवाल पालिकेला सादर करावयाचा असल्याने उर्वरित 2 लाख 75 हजार वृक्ष गणना करण्याचे काम पुन्हा वाढीव कालावधी देऊन कंत्राटदाराला देण्यात आला होता. त्यासाठी 24 लाख रुपये 85 हजार रुपयांचे कंत्राट तिसर्यांदा वाढवून दिले होते. कंत्राटदाराने तब्बल 29 लाख 75 हजार झाडांची गणना केली असून त्यासाठी पालिकेने 2 लाख 86 हजार 65 हजार रुपये इतका खर्च केला आहे.