30 लाख रुपयांच्या लूटप्रकरणी दोन आरोपींना अटक

0

मुंबई – घातक शस्त्रांचा दाखवून एका व्यापार्‍यासह दोघांना जिवे मारण्याची धमकी देत सुमारे 30 लाख रुपयांची रोकड पळविणार्‍या दोन आरोपींना काल गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. रमेश चौधरी आणि भाकाराम चौधरी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे राजस्थानचे रहिवाशी आहे. सध्या ते शिवडीतील दारुखाना परिसरात राहत होते. लुटमारीनंतर ते दोघेही राजस्थानला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी नागपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विक्रम नवाराम पुरोहित हे व्यवसायाने व्यापारी असून ते मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीच्या 8/ए इमारतीमधील फ्लॅट क्रमांक 30 मध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात.

11 जुलैला दुपारी तीन वाजता ते त्यांचा सहकारी चंपालाल पुरोहित याच्यासोबत सिटीसेंटर मॉल येथे गेले होते. तेथून ते दोघेही त्यांच्या अ‍ॅक्टिव्हा बाईकवरुन घराच्या दिशेने जात होते. सव्वातीन वाजता ते बीआयटी चाळ समोरुन जात होते. याच दरम्यान तिथे दोन मोटारसायकलवरुन चार तरुण आले. काही कळण्यापूर्वीच या चौघांनी त्यांना मारहाण करुन घातक शस्त्रांचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्या अ‍ॅक्टिव्हाच्या डिक्कीत ठेवलेली सुमारे 30 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पलायन केले होते. या चौघांचाही विक्रम पुरोहित यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आर. एस. निमकर मार्गावरील कामाठीपुराच्या दिशेने पळून गेले. या घटनेनंतर त्यांनी नागपाडा पोलिसांत जबरी चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारीही या गुन्ह्यांचा संमातर तपास करीत होते. हा तपास सुरु असतानाच जगदीश साईल, प्रशांत राजे, इक्बाल आवळकर, शिखरे, सुनिल मोरे, मनोजकुमार तांबडे, रामचंद्र पाटील, तुषार जगताप आणि राजेश सोनावणे यांनी राजस्थानला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या रमेश आणि भाकाराम चौधरी या दोघांनाही अटक केली. चौकशीत त्यांनी या गुन्ह्यांची कबुली देताना त्यांच्या इतर चार साथीदारांची नावे सांगितली आहे. चारही आरोपी गुन्हा घडल्यानंतर राजस्थानात पळून गेले आहे. त्यांच्या अटकेसाठी आता राजस्थान येथे एक टिम पाठविण्यात आली आहे. दोन्ही आरोपींचा ताबा नागपाडा पोलिसांना सोपविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांनी सांगितले.