30 वर्षांनंतर घेतला पराभवाचा बदला

0

चेन्नई । चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये रविवारी भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया दुसर्‍यांदा आमनेसामने आले. 30 वर्षांपूर्वी याच मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला सामना झाला होता. चेन्नईमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना 9 ऑक्टोबर 1987 रोजी खेळवण्यात आला होता. 1987 च्या रिलायन्स विश्‍वचषक स्पर्धेतील तो तिसरा सामना होता. या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या एका धावेने पराभव सहन करावा लागला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या झालेल्या पराभवाचा बदला 30 वर्षांनंतर विराट कोहलीच्या भारतीय संघाने घेतला. 1987मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अ‍ॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली भारतासमोर विजयासाठी 271 धावांचे आव्हान होते. प्रत्युत्तरादाखल भारताचा डाव 269 धावांवर संपुष्टात आला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताला एका धावेने पराभव पत्करावा लागला होता. रविवारच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 26 धावांनी(डकवर्थ लुईसच्या नियमानुसार) हरवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 281 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला 21 षटकांत 164 धावा करणे आवश्यक होते. मात्र त्यांना 137 धावाच करता आल्या. भारताच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातल्या विजयाचे शिल्पकार ठरले ते हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनी. भारताची अवस्था 87/5 अशी असताना हार्दिक पांड्याच्या 66 बॉल्समध्ये 83 आणि धोनीच्या 88 बॉल्समध्ये 79 रन्समुळे भारतानं 50 ओव्हरमध्ये 281 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 21 षटकांमध्ये 164 धावा करणेआवश्यक होत्या. पण भारतीय गोलंदाजांनी कांगारूंना जोरदार धक्के देत 21 षटकांमध्ये 9 बाद 137 धावांवर रोखलं. भारताच्या यजुवेंद्र चहलने 3 तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी एक विकेट घेण्यात मिळाले.

टीम इंडियाचा क्रिकेटर आर. अश्विन याने त्याच्या खास चाहत्यांपैकी एक असलेल्या पी.वेंकटेशन यांची एक मोठी इच्छा पूर्ण केली आहे. अश्विन भलेही सध्या संघामध्ये नसला तरी त्याने वेंकटेशन यांना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे तिकीट दिले आणि वेंकटेशन यांच्या चेहर्‍यावर हसू फुलले. वेंकटेशन हे सध्या किडनीच्या आजारावर उपचार घेत आहेत. त्यांना अश्विनने तिकीट दिल्यावर हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये बसून सामन्याचा आनंद घेतला. त्यांनी अश्विन आणि त्याच्या मॅनेजमेंटचे आभार मानले. माझ्यासारख्या माणसासाठी अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. मी अश्विनचे हे उपकार कधीही विसरणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अश्विनने सांगितले की,आम्ही हे अजिबातच पब्लिसिटीसाठी केलं नाही. एखाद्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर हसू आणण्याचा हा अश्विन फाऊंडेशनचा एक प्रयत्न होता. प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणे तसे कठिणच, पण आम्ही प्रयत्न करत असतो.

धोनीसारखा कोणी नाही
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्यापहिल्या एकदिवसीय सामन्या शानदार 83 धावांची खेळी करणार्‍या हार्दिक पांड्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आघाडीचे फलंदाज झटपट बाद होत असताना धोनी आणि पांड्याने खेळपट्टीवर टिकून राहत 118 धावांची भागीदारी करत सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. सामना जिंकल्यानंतर पांड्याने आपल्या खेळीचे श्रेय धोनीला दिले. या खेळीबाबत बोलताना पांड्या म्हणाला, जेव्हा आम्ही दोघे खेळपट्टीवर होतो तेव्हा सतत एकमेकांशी चर्चा करत होतो. यामुळेच दोघांमध्ये 118 धावांची भागीदारी होऊ शकली. पहिल्या 6 ओव्हरमध्ये तीन विकेट गमावल्यानंतर संघावर दबाव होता. यावेळी धोनीने मला खेळपट्टीवर टिकून राहत मोठी खेळी करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला स्ट्राइक रोटेट करत आम्ही धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. आमचे सुरुवातीला 230 धावांचेच लक्ष्य होते. पांड्या पुढे म्हणाला, आजही धोनीसारखा फिनिशर दुसरा कोणी नाही. ड्रेसिंग रुममध्ये धोनीच्या उपस्थितीत खूप काही शिकायला मिळते.

अन् धोनी जमिनीवरच झाला रिलॅक्स
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याएकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा 26 धावांनीविजय झाला. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने 1-0ची आघाडी घेतली आहे. 21 सप्टेंबरला ईडन गार्डन मैदानावर दुसरा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी भारतीय संघ कोलकत्याला रवाना झाला आहे. कोलकत्याला जात असताना भारतीय संघ रिलॅक्स मूडमध्ये पाहायला मिळाला. धोनीतर चक्क विमानतळाच्या जमिनीवरच झोपलेला पाहायला मिळाला. धोनी झोपलेला असताना त्याच्या बाजूला विराट कोहली, के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या बसलेले होते.

हे झाले विक्रम
1हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 83 धावांची खेळी केली.एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी 18 जून 2017 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 76 धावा केल्या होत्या.

2भारताकडून पहिल्यांदा सहा आणि सातव्या क्रमांकावर खेळणार्‍या फलंदाजांनी 75 हून अधिक धावा केल्या.

3ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली दुसर्‍यांदा शून्यावर बाद झाला. तो इंग्लंडकडून सर्वाधिक तीन वेळा शून्यावर बाद झाला.

4ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचे तीन आणि चार क्रमांकावर खेळणारे क्रिकेटर शून्यावर बाद झाले. भारताकडून चौथ्यांदा हे घडलंय.