ठाणे । गेल्या वर्षभरापासून 4 हजार गुंतवणूकदारांची तब्बल 300 कोटींची फसवणूक करणारा सागर इन्व्हेस्टमेंट या कंपनीचा मुख्य सूत्रधार श्रीराम समुद्रच्या मुसक्या अखेर आवळल्या आहेत. समुद्रला अटक करून न्यायालयात हजर केले असता 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, मुंबई, पुणे आणि ठाणे येथील सुमारे 4 हजारहून अधिक गुंतवणूकदारांना श्रीराम समुद्र याने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. यानंतर तो गाशा गुंडाळून पळाला होता. त्यामुळे अनेक ठेवीदार हे हवालदिल झाले होते.
या विरोधात संघर्ष समिती स्थापन करून त्याचे नेतृत्व शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे हे करत होते. श्रीराम समुद्रच्या मुसक्या आवळून त्याला जेलमध्ये टाकावे, अशी मागणी सातत्याने त्यांनी लावून धरली होती. अखेर त्यांनी आणि संघर्ष समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले आहे. श्रीराम समुद्राच्या मुसक्या आवळल्यामुळे त्याने जमविलेली माया आणि ठेवीदारांचे बुडविलेले पैसे नेमके कुठे आहेत आणि ते परत कधी मिळणार याबाबत आता ठेवीदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच श्रीराम समुद्र याने मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीनसाठी अर्ज सादर केला. मात्र, न्यायालयाने श्रीरामचा जामीन अर्ज फेटाळला. त्याचबरोबर श्रीराम याला 8 मार्चपर्यंत आर्थिक गुन्हे शाखा ठाणे यांना शरण येण्याचे आदेशदेखील उच्च न्यायालयाने दिले होते. दरम्यान, या प्रकरणात याआधी कंपनीचे संचालक सुहास आणि सुनीता समुद्र यांना अटक झाली होती. मात्र न्यायालयाने प्रकृती आणि वयाच्या निकषावर जामीन मंजूर केला आहे.