पुणे । शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा उपक्रम आयोजित केला होता. यात तब्बल 3 हजार 82 विद्यार्थी सहभागी झाले होते. या मुलांनी एकाच वेळी 3 हजार 82 पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरले आहे. हा उपक्रम सकाळी 10.40 वाजता सुरू झाला. विद्यार्थ्यांना शिल्पकार विवेक खटावकर यांनी मार्गदर्शन केले आणि गणरायाची मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. विद्यार्थ्यांनी आपली कलात्मकता दाखवत मातीच्या गोळ्यातून सुबक आणि देखण्या गणेश मूर्ती साकारल्या. यावेळी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीबरोबर बिया देण्यात आल्या. या बिया मूर्ती तयार करताना त्यामध्ये वापरण्यात आल्या आहेत. या मूर्ती विद्यार्थ्यांना देण्यात आल्या असून गणेश मूर्तीचे विसर्जन घरासमोर करून ते झाड वाढविण्याच्या सूचनाही विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
1 तास 31 मिनीटांत साकारल्या मूर्ती
या रेकॉर्डमध्ये सहभागी होणार्या प्रत्येक विद्यार्थ्याला 3 किलो मातीची पिशवी आणि 2 बिया त्यामध्ये टाकण्यासाठी देण्यात आल्या आहेत. तयार करण्यात आलेल्या मूर्ती विद्यार्थी घरी नेऊन प्राणप्रतिष्ठा करणार आहे, असे सांगण्यात आले आहे. पहिला रेकॉर्ड हाँगकाँगमध्ये झाला होता. तेथे 1082 गणपती बनवण्यात आले होते. शहरातील विद्यार्थ्यांनी हा रेकॉर्ड मोडीत काढला. 1 तास 31 मिनिटांत 3082 गणेश मूर्ती मुलांनी साकारल्या.
जावडेकर यांनी साधला संवाद
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सहभागी झालेल्या काही विद्यार्थी संवाद साधत गप्पा देखील मारल्या. त्यानंतर या उपक्रमास सुरुवात झाली. तसेच आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागताला काही तास शिल्लक असताना या उपक्रमातून विद्यार्थीच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केल्याची भावना व्यक्त केली. लाडक्या गणरायाची मूर्ती साकारताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद पाहावयास मिळाला.
यांची होती हजेरी
सणस मैदानावर आयोजित केलेल्या उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार मेधा कुलकर्णी, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, पालिका सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, भाजपचे नगरसेवक, शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी, शहरातील विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे आयोजित केलेला उपक्रम देशासमोर आदर्श निर्माण करणारा आहे. यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक धिरज घाटे यांनी केले तर उपमहापौर डॉ. धेंडे यांनी आभार मानले.