309 वर्षांची अखंड परंपरा ; आषाढी वारीसाठी संत मुक्ताई पालखी 18 जूनला निघणार

0

34 दिवसांचा पायी प्रवास ; मानाच्या सात पालख्यांमध्ये संत मुक्ताई पालखीचा समावेश

मुक्ताईनगर- 309 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताई पालखी 18 जूनला पंढरपूरकडे निघणार आहे. तब्बल 34 दिवस पायी प्रवास करून ही पालखी 20 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीत मुक्ताईंच्या पादुकांचे पूजनानंतर मुक्ताई पालखी 18 जून रोजी सकाळी 10 वाजता जुने मुक्ताई मंदिरातून पंढरीच्या प्रवासाला निघेल. शहरातील नवीन मंदिरात दुपारी विसावा घेवून पालखी तालुक्यातील सातोड गावी पहिला मुक्काम करणार आहे. तेथून 19 जून रोजी पालखी सोहळा मलकापूर तालुक्याकडे रवाना होईल. तब्बल 34 दिवसांचा पायी प्रवास करून मलकापूर, बुलडाणा, चिखली, जालना, बीड, भूम, माढा मार्गे पालखी 20 जुलैला पंढरी गाठेल, असे संस्थानचे अ‍ॅड.रवींद्र पाटील व सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले.

भक्तांना विठ्ठल दर्शनाचे वेध
आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातील मानाच्या प्रमुख सात पालख्या श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल होतात. या आषाढी वारीसाठी कोथळी (ता.मुक्ताईनगर) येथील समाधी स्थळावरून संत मुक्ताईंची पालखी 18 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. जून महिन्यात महाराष्ट्रातील लाखो वारकर्‍यांना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाचे वेध लागतात. वारकरी आषाढी वारीसाठी घरातून बाहेर पडतात. राज्याच्या कानाकोपर्‍यातून निघणार्‍या हजारो दिंड्यामध्ये सहभागी होत वारकर्‍यांचा हा जथ्था सावळ्या विठ्ठलासमोर नतमस्तक होतो. या आषाढी उत्सवासाठी श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल होणार्‍या मानाच्या सात प्रमुख पालख्यांचा कोथळी येथील आदिशक्ती संत मुक्ताई पालखीचा समावेश आहे.

निर्मल वारी- हरित वारी -अ‍ॅड.रवींद्र पाटील
संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी यंदापासून ’निर्मल वारी हरीत वारी’ ही संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार संपूर्ण प्रवासात प्लास्टिक ताट, ग्लास, कप, वाटी, कॅरीबॅगचा वापर न करण्याचे ठरले आहे. भाविक, वारकर्‍यांजवळ वेगवेगळ्या झाडांचे बीज देवून वृक्षारोपण करणार आसल्याचे उद्धव जुनारे महाराज म्हणाले.