थकबाकी भरल्यानंतर ओडीएचा वीजपुरवठा अखेर सुरळीत
भुसावळ- थकीत वीजबिलांमुळे गेल्या 17 दिवसांपासून ओडीएचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने तीन तालुक्यातील 31 गावे तहानली होती. बोदवड शहराला सर्वाधिक टंचाईचे चटके जाणवत असल्याने संताप व्यक्त होत होता. 28 रोजी जिल्हा परीषदेने पाच लाख तर नगरपंचायतीने दहा लाखांची थकबाकी भरल्यानंतर बुधवारी रात्री 10 वाजता वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतर तब्बल 17 व्या दिवशी शहराला पाणीपुरवठा करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
31 गावांचा पाणीपुरवठा झाला सुरळीत
भुसावळ, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या 81 गावे पाणीपुरवठा योजनेतून सद्य:स्थितीत 31 गावांचा पाणी पुरवले जाते मात्र वीज कंपनीची साडेतीन कोटी रुपये थकबाकी झाल्याने 12 नोव्हेंबरला ओडीएचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांना टंचाईचा सामना करावा लागत होता. ओडीए योजनेची जवळपास तीन कोटी 98 लाख 55 हजार 962 रूपयांची थकबाकी होती. यात भुसावळ पंचायत समितीकडे दोन कोटी 21 लाख 70 हजार 490, तर बोदवड तालुक्यात एक कोटी 76 लाख 78 हजार 739 आणि मुक्ताईनगर सहा हजार 733 रुपये थकबाकी होती. सोबतच वरणगावसह इतर चार गावांना पाणीपुरवठा करणार्या स्वतंत्र योजनेचे 52 लाख 66 हजार 510 रूपये ग्रामपंचायतींकडे थकले होते. यातून काही रक्कम वितरण कंपनीकडे भरण्यात आल्यानंतर वीज जोडणी करण्यात आली. दरम्यान, बोदवड शहराल 28 रोजी रात्री वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर रात्रभर पाईपांची स्वच्छता केल्यानंतर दुसर्या दिवशी पहाटे सहा वाजता पाणीपुरवठ्यास सुरूवात झाली तर जुने रोहित्र दुरुस्तीला टाकण्यात आले असून ते दुरुस्त होईपर्यंत राखीव ठेवण्यात आललेले रोहित्र वापरले जात आहे.