31 ऑक्टोबरआधी शेतकर्‍यांना कर्जमाफी

0

मुंबई । कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून संपावर असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 31 ऑक्टोबरआधी गरजू शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली. राज्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमाफी असेल असाही दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला आहे. सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जमाफी कोणाला द्यायची आणि कशी द्यायची यासाठी चार महिन्यांचा अवधी मागण्यात आला आहे. चार महिन्यांत अभ्यास करून कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार आहे. गरजू शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. शेतकरी संपाबाबत सरकारची चर्चेची तयारी आहे. मात्र शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण करणार्‍यांशी चर्चा केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. कर्जमाफीबाबत ज्यांना सूचना द्यायच्या आहेत, त्यांचे स्वागत असल्याचे ते म्हणाले.

हिंसा कोण घडवते याची माहिती आहे
राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात कुणीही शेतकरी सहभागी झालेला नाही. महाराष्ट्र बंदच्या नावाखाली रास्ता रोको, दगडफेक, जाळपोळ कोण करत होतं, याची माहिती आमच्याकडे आहे. शेतकर्‍यांच्या मागे लपून काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्याचे काम करत आहेत, असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राज्यात 307 बाजार समित्यांपैकी 300 समित्या कार्यरत होत्या. इतर 7 पैकी 3 बाजारात समित्यांनी बंद पाळला तर 4 बाजार समित्या सुट्टीवर होत्या, असा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना केला.

आयटीचा वापर करणार
मागच्या काळात कर्जमाफीसाठी घोटाळा झाला. तो पुन्हा होऊ नये यासाठी आंध्रप्रदेश च्या धर्तीवर आयटी टेक्नॉलॉजिचा वापर करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. याआधी कर्जमाफीत घोटाळा झाला असल्याचं कॅगने सांगितलं आहे. त्यामुळेच आयटी बेस सिस्टीम तयार करण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी याप्रसंगी दिली.

सेनेसह स्वाभिमानाला टोला
यूपी, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये कर्जमाफी झाली, ती त्या राज्यांनी दिली. त्यांची परिस्थिती वेगळी आहे. पण महाराष्ट्राची स्थिती वेगळी आहे. त्यासाठी दूरगामी निर्णय घ्यावे लागतील. आम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ नक्कीच देणार आहोत, असे कर्जमाफी विषयी बोलताना केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले. स्वाभिमान संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि शिवसेना यांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारमध्ये राहून काय करता येईल हे पहावे, असा टोलाही नायडू यांनी लगावला.

मंत्रीमंडळाची बैठक
राज्यातील शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री मंत्रीमंडळातील आपल्या सहकार्‍यांची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या बैठकीत संवाद शिवार यात्रेचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र राज्यात पेटलेले शेतकर्‍यांचे आंदोलन आणि सरकारचा महत्त्वाचा घटक पक्ष शिवसेना यांनी संपाला दिलेला पाठिंबा, तसेच नुकतेच खासगी संस्थेकडून भाजपने केलेले सर्व्हेक्षण या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीतला तपशील मात्र बाहेर आला नाही.