पुणे । 31 डिसेंबरला ड्राय डे केला पाहिजे? या मागणीसाठी आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे मंडईतील टिळक पुतळ्यासमोर जनमत स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोहिमेला पाठिंबा दिला. यावेळी केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, राजन चांदेकर, हर्षल पंडित, अनिरुद्ध हळंदे, प्रकाश भिडे, प्रमोद शेळके, समीर कुलकर्णी, संतोष राऊत यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दारुची दुकाने व परमिट रुम उशीरापर्यंत सुरू ठेवण्याचा सरकारचा निर्णय व्यसनाधिनतेला पोषक वातावरण निर्माण करणारा आहे. गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पिकर्स रात्री 10 वाजता बंद केले जातात, त्याला मर्यादा घातली जाते. मात्र, 31 डिसेंबरला मर्यादा घातली जात नाही. यामुळे तरुणाई व्यसनाधिनतेच्या जाळ्यात ओढली जात असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, असे डॉ.अजय दुधाणे यांनी सांगितले. सनबर्नसारख्या फेस्टिव्हल्सना मान्यता देऊन देखील व्यसनाधिनतेला पूरक वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे ड्राय डे संबंधिचे निवेदन महापौर, पालकमंत्री आणि इतर शासकीय अधिकार्यांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.