पुणे । पुणे जिल्ह्यात होणार्या 31 डिसेंबरच्या पार्ट्या व हुक्का पार्लर बंद करण्याची मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे ग्राहक आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश पवार यांनी पुणे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्यांकडे केली आहे.
पुण्यात होणार्या मद्यधुंद पार्ट्यामधून होणारे गैरप्रकार थांबविण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली. हिंदू संस्कृतीला न पटणार्या या गोष्टी आहेत. वेळेतच या पार्ट्यांना आळा घाला. यातून तरुण तरुणीचे अपघात घडतात व छेडछाडीचे प्रकार घडतात. अशा पार्ट्यांमध्ये 18 वर्षाखालील तरुण तरुणी दारू व हुक्क्याच्या आहारी गेलेल्या दिसतात. अशाने तरुण पिढी चुकीच्या मार्गाने वळते व यातून राष्ट्राचेही नुकसान होते. त्याकरीता अखिल भारतीय छावा संघटना 31 डिसेंबरच्या पार्ट्यांचा निषेध करत आहे. या पार्ट्या बंद न झाल्यास छावा संघटना आपल्या स्टाईलने बंद करेल व याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे ग्राहक आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश पवार, राजाभाऊ पवार, अनिल पाटील, गणेश जाधव, शरद कुंभार आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.