पुणे । स्कॉर्पिओ गाडीसह चालकाचे अपहरण करून 31 लाख रुपये चोरून नेल्याची घटना 24 ऑगस्ट रोजी शिवाजीनगरहून पुणे विद्यापीठाकडे जाणार्या रस्त्यावर भरदिवसा घडली होती. पुणे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून चांदणी चौकात सापळा रचून दोघांना अटक केली आहे. आरोपींनी अशाप्रकारे गुजरात, कर्नाटक, दिल्ली, राजस्थान व इतरही राज्यात दरोडे टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सूरज उर्फ सूर्या कनुभई राठोड उर्फ हालपटी (वय 34, दिव-दमण) आणि कमलेश बाबूभाई धोडी (वय 26, रा. गुजरात) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या अन्य सहा साथीदारांची नावेही समजली झाली असून सध्या ते फरार आहेत.
21 लाखांची रोकड जप्त
मनोज डेंडोरे राजेश मणीलाल अॅण्ड कुरिअर कंपनीची 31 लाख रुपयांची राकड घेऊन स्कॉर्पिओ गाडीतून जात होते. त्यादरम्यान आरोपींनी डेंडोरे यांची गाडी अडवून इतर दोन कामगारांना खाली उतरवले आणि स्कॉर्पिओसह त्यांचे अपहरण करून त्यांना तळेगाव येथे सोडून रोकड घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी डेंडोरे यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना हालपटी आणि धोडी स्कॉर्पिओने दिव दमण येथे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातून रोख 21 लाख, एक स्कॉर्पिओ गाडी आणि दोन एअरगन असा एकूण 31 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.