31 हजार वाहनधारकांकडून 72 लाखांचा दंड वसुल

भुसावळ शहर वाहतूक शाखेची शहरात धडक मोहिम

भुसावळ : शहरात बेशिस्त वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून धडक मोहिम राबवली जात आहे. नियम मोडणार्‍यांवर कायद्याचा बडगा दाखवत त्यांच्याकडून दंड वसुली केली जात असून या माध्यमातून वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न शहर वाहतूक शाखेने केला आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक हनुमंत गायकवाड व सहकार्‍यांनी जानेवारी ते जून या सहा महिन्यांदरम्यान 32 हजार 905 केसेसच्या माध्यमातून तब्बल 71 लाख 83 हजारांचा दंड वसूल केला. ट्रिपल सीट प्रवास करणारे वाहनधारक, कागदपत्रे नसणारी वाहने, परवाना नसणारे चालक आणि तोंडाला मास्क न लावणार्‍या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.

सहा महिन्यात अशा झाल्या केसेस
वाहतूक शाखेच्या माहितीनुसार, रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 250, वाहन चालविण्याचा परवाना नसल्याप्रकरणी 13 हजार 139, ट्रीपल सीट वाहन चालविणे एक हजार 53, फ्रंट सीट वाहतूक 89, वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलणे 602, वाहनावर नंबर न टाकणे/फॅन्सी नंबर प्लॅट 786, विना गणवेश एक हजार 405, विना हेल्मेट एक हजार 372, सीट बेल्ट न लावणे 734 तसेच इतर मोटार वाहतूक कायद्यान्वये 13 हजार 475 केसेस करण्यात आल्या. एकूण 32 हजार 905 केसेसच्या माध्यमातून 71 लाख 83 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला.

नियमांचे करावे पालन : हनुमंत गायकवाड
वाहनधारकांनी वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळून कटू कारवाई टाळावी, असे शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक हनुमंत गायकवाड म्हणाले. पालकांनी अल्पवयीन पाल्यांना वाहने देवू नयेत अन्यथा पालक व पाल्यांवरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगत वाहनांचे सायलेन्सर काढून आवाजाचे प्रदूषण करणार्‍या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांचे लक्ष असून अशा वाहनधारकांवर आम्ही गुन्हे दाखल करू, असेही ते म्हणाले.