पिंपरी-चिंचवड :- पवना धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून सलग तिन वर्षे धरण क्षेत्रातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या धरणातून शहरासह एमआयडीसी, तळेगांव, देहूरोड आणि मावळातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे मागील 15 दिवसात तब्बल 31 हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून तीन वर्षात एकूण 106 क्युबिक मीटर गाळ धरणातून बाहेर निघाल्याने धरणातील पाणीसाठ्यात यावर्षी आखणी वाढ होणार आहे.
सलग तिस-या वर्षी सातत्याने काम सुरु ठेवले
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासीयांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सलग तिस-या वर्षी सातत्याने काम सुरु ठेवले आहे. मागील सलग दोन वर्षे ७५ क्युबिक मीटर गाळ पवना धरण क्षेत्रातून काढल्यानंतर यावर्षी पुन्हा 10 मे 2018 पासून गाळ काढण्याचे धरण क्षेत्रात सुरू करण्यात आले. पवना धरण क्षेत्रातील ठाकुरसाई, खडक देवंडे, जोण, आपटी अशा विविध गावांसह हे गाळ काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामाची खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी केली. यावेळी पाटबंधारे शाखा अभियंता मनोहर खाडे, तांत्रिक सहाय्यक तांबोई, शिवसेना विभाग प्रमुख अमित कुंभार आदी उपस्थित होते.
दरम्यान, स्थानिक शेतक-यांशी खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून गाळ काढण्याचे काम करणा-यांना स्थानिक शेतक-यांना कुठल्याही प्रकार त्रास होणार नाही. त्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. शेतक-यांचे कोणतेही नुकसान होणार नाही व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सायंकाळी उशिरा गाळ वाहतूक करू देऊ नका. याकडे लक्ष देण्यास पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना खासदार बारणे यांनी सांगितले.