318 वाहनचालकांवर कारवाई!

0

जळगाव । म हामार्गावर सर्वाधिक अपघात हे दुचाकीस्वारांचे झाले आहेत. यामध्ये डोक्याला मार लागल्यानेच अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याचेही निदर्शनास आले आहे. या दुचाकीस्वारांना हेल्मेट असते तर ते वाचण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर आजपासून हेल्मेट व सिटबेल्ट सक्ती करण्यात आली असल्याने वाहतूक पोलिस विभागाने सकाळपासूनच हेल्मेट, सिटबेल्ट कारवाईचा धडाका सुरू केला. आज हेल्मेट व सिटबेल्ट न घातल्याने 318 वाहन चालकांवर कारवाई केली. ही कारवाई जिल्हा वाहतुकच्या पाच तर शहर वाहतुकच्या पाच अशा 10 पथकांनी विविध चौकात उभे राहून कारवाई केली. दरम्यान, या वाहनधारकांकडून सुमारे 60 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पोलिस दलातर्फे जनजागृती
जिल्ह्यातील सर्व महामार्ग व राज्य माहामार्गावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी हेल्मेट व सिटबेल्ट सक्ती करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात हेल्मेटसक्तीचा बडगा उगारण्यात आला. कारवाईची माहिती मिळताच अनेकांनी आज अडगळीतील हेल्मेट बाहेर काढले. यातच वाहतूक शाखा पोलिसांनी जानेवारीत रस्ता सुरक्षा अभियान राबविले. यादरम्यान रॅली काढून हेल्मेट वापरण्याचा संदेश व सूचना सामान्य नागरिकांना दिल्या होत्या. त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणार्‍यांवर तुरळक कारवाई करीत हेल्मेटसक्तीचे संकेत दिले होते. मात्र, अनेकांनी या कारवाईकडे दुर्लक्ष केले. मात्र, आज शुक्रवारी वाहतूक पोलिसांनी सकाळी नऊ वाजतापासूनच सिटबेल्ट हेल्मेटसक्तीच्या कारवाईची सुरुवात केली. सामान्यांसह भाऊ-दादांवरही कारवाई करण्यात आली.

विविध चौकात कारवाईचा बडगा
सकाळपासूनच शहर वाहतुक शाखा विभागाचे पाच पथक अंजिठा चौफूली, शासकीयआयटीआय, आकाशवाणी चौफुली, गुजराल पेट्रोलपंप, कालिंकामात चौफुली आदी ठिकाणी तर जिल्हा वाहतुक शाखेचे जिल्ह्यातील विविध ठिकाणी कारवाईसाठी तैनात होते. त्यामुळे महामार्गावर आज सिटबेल्ट, हेल्मेटसक्ती सुरू झाल्याने दुचाकी व कारचालक टार्गेट‘ करण्यात आले. अशा 318 वाहनचालकावर कारवाई करण्यात आली. पाच ते सहा दिवसांपासून सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. आजपासून दंडात्मक कारवाई सुरू झाली.आज वाहतूक पोलिसांनी कुणालाही सूट न देता कारवाई केली. त्यामुळे आज भाऊदांदावर लगाम लागला गेला.

नियमांचे उल्लंघन;कडक कारवाई
शुक्रवार सकाळपासूनच हेल्मेटसक्तीची कारवाई सुरू झाली. त्यामुळे अनेकांनी हेल्मेट विक्रेत्यांकडे धाव घेतली. अनेकांनी आपापल्या सोयीनुसार हेल्मेट विकत घेतले. त्यामुळे हेल्मेट विक्रीच्या दुकानांवर आज गर्दी होती. तसेच जिल्हा पालिस दलातर्फे ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याने नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दुचाकीचालकांनी हेल्मेटचा तर कारचालकांनी सिटबेल्टचा वापर करण्याच्या सुचना पोलिस अधीक्षकांनी केल्या आहेत. तर दुचाकी अतिवेगाने चालवणे, विना लायसन्स चालविणे, ट्रीपल सिट, विना नंबरप्लेट, विचित्र नंबर प्लेट, अल्पवयीनांनी वाहन चालविणेआदी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.