32 गावांमध्ये हागणदारीमुक्तीला यश

0

मुक्ताईनगर। गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने स्वच्छ महाराष्ट्र मिशन हाती घेतले आहे. 22 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या अभियानात आतापर्यंत तालुक्यातील 62 पैकी 32 गावे हागणदारीमुक्त झाल्याची माहिती प्रभारी गटविकास अधिकारी एस.जी.बैरागी यांनी दिली. उघड्यावरील हागणदारीमुक्तीसाठी जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीवर जोर दिला आहे. त्यात 31 मे अखेरपर्यंत संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त करावयाचा असल्याने प्रशासनाने कृती आराखड्याच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला आहे. विशेषत: योजनेत लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी गावागावात स्वच्छता रथ फिरवण्यात आला.

उर्वरित 30 गावांमध्ये योजनेची झपाट्याने अंमलबजावणी
दरम्यान, सन 2012च्या पायाभूत सर्वेक्षण यादीत नावे असलेल्या तसेच यापूर्वी शौचालय बांधकाम योजनेचा लाभ घेतलेल्या कुटुंबाला वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी 12 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तालुक्यातील 62 ग्रामपंचायतींमधील 33 हजार 679 पैकी शौचालये नसलेली 19 हजार 407 कुटुंबे या अनुदानासाठी पात्र होती. 21 एप्रिलपर्यंत या 19 हजार 407 पैकी 10 हजार 207 कुटुंबीयांनी शौचालयाचे बांधकाम केल्याने 32 गावे हागणदारीमुक्त झाली. आता उर्वरित 30 गावांमध्ये योजनेची झपाट्याने अंमलबजावणी सुरू आहे.

हागणदारीमुक्त गावे
बेलसवाडी, बोदवड, बोरखेडे, मोरझिरा, चारठाणे, मधापुरी, चिखली, चिंचखेडा खुर्द, धुळे, तालखेडे, चिंचोल, धामणगाव, दुई, हिवरे, उमरे, जोंधनखेडा, काकोडे, महालखेडा, मानेगाव, मेहुण, कोठे, नायगाव, नांदवेल, नरवेल, पंचाणे, पातोंडी, पिंप्रीअकाराऊत, पिंप्रीनांदू, सालबर्डी, सातोड, थेरोळे, वायला ही तालुक्यातील गावे 100 टक्के हागणदारीमुक्त झालेली आहेत.

तालुक्यातील 32 गावांव्यतिरिक्त अंतुर्ली, भोटा, चांगदेव, चिंचखेडा खुर्द, कर्की, लोहारखेडे, मुक्ताईनगर, कोथळी, पिंप्रीपंचम, सुळे, पुरनाड, राजुरा, सारोळा, तरोडा ही गावे हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करत आहेत. तर घोडसगाव, हलखेडा, कोर्‍हाळे, निमखेडी खुर्द, पारंबी, पिंप्राळे, सुकळी, टाकळी, वढोदे या गावात हागणदारीमुक्तीचे 50 टक्के कामे झालेली आहेत. येथील कामांना गती देण्यासाठी समन्वय गरजेचा आहे.

कडक कारवाईची गरज
शासन स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात हागणदारीमुक्तीसाठी अभियान राबवित आहे. यास ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. बहुतांश आजार हे अस्वच्छतेमुळेच फैलावतात त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिसर स्वच्छता, गाव, शहर व पर्यायाने देशाच्या स्वच्छतेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात 50 टक्क्यांच्या जवळपास उद्दीष्ठ पूर्ण झाले असून यात आणखी प्रयत्न करुन 100 टक्के उद्दीष्ठ गाठण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गावे हागणदारीमुक्त होतील. मात्र काही नागरिकांकडे शौचालय असून देखील याचा वापर केला जात नाही. यासाठी हि मोहिम आणखी तीव्र करण्यासाठी उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांच्या शासकीय सुविधा बंद करण्याची कारवाई केल्यास यात आणखीच यश मिळू शकते.