320 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप

0

मुंबई : सुलभ पीक कर्ज अभियानाद्वारे राज्यभरातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सोलापूर,परभणी,हिंगोली,जालना,बीड, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, नागपूर व वर्धा या जिल्ह्यामध्ये 44 हजार 790 शेतकर्‍यांना 320 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. राज्यात 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असून यामधील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वगळता अन्य बँकाद्वारे शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटप करण्यात येते.

कुमकुवत जिल्ह्यांपासून झाली सुरुवात
सहकार विभागाने 6 जून 2017 रोजीच्या परिपत्रकाव्दारे कमकुवत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकांच्या जिल्हयात शेतकर्‍यांना चालू वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामात व्यापारी बॅकांमार्फत पीक कर्ज पुरवठा करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सुलभ पीक अभियानास सुरूवात झाली व 6 जून ते 31 जुलैपर्यत हे अभियान गावपातळीवर राबविण्यात येणार आहे.या अभियानाला शेतक-यांचा चांगला प्रतिसाद लाभला व त्याव्दारे या 16 जिल्ह्यामध्ये एकुण 1651 मेळावे घेण्यात आले.

शेतकरी मेळाव्यांचे आयोजन
या मेळाव्यांमध्ये शेतकर्‍यांनी चांगला सहभाग नोंदवला. या मेळाव्यामध्ये 64 हजार 400 शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. सुलभ पीक कर्ज मेळाव्यातच संबंधीत यंत्रणांनी शेतकर्‍यांकडून 60 हजार 773 अर्ज भरुन घेतले व या मेळाव्यातच 44 हजार 790 शेतकर्‍यांना प्रत्यक्ष एकूण 320 कोटी रूपये रकमेचे कर्ज वितरीत करण्यात आले. या अभियानाला शेतकर्‍यांचा प्रतिसाद पाहता हे अभियान 31 ऑगस्ट 2017 पर्यंत राबविण्यात येणार आहे.