पुणे । राज्यात साखरेचे उत्पादन वाढत असताना प्रति क्विंटलमागे साखरेचे दर कोसळत आहेत. त्यामुळे राज्यातील साखर उद्योगापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने ही साखर खरेदी करावी, असा प्रस्ताव साखर आयुक्तालयाने राज्य शासनाला दिला आहे. त्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून राज्यात उत्पादित झालेल्यापैकी दहा लाख मेट्रिक टन साखर प्रति क्विंटल तीन हजार दोनशे रुपयांनी राज्य शासन खरेदी करणार आहे. येत्या आठवडाभरात या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी दिली. एका बैठकीसाठी सहकारमंत्री देशमुख पुण्यात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा उसाचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत राज्यात ऐंशी लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. अद्यापही वीस ते बावीस टक्के ऊस गाळप शिल्लक आहे. त्यातून यंदा साखरेचे उत्पादन नव्वद लाख मेट्रिक टनापर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. साखरेच्या वाढलेल्या उत्पादनामुळे देशातील साखरेचे दर प्रति क्विंटल दीडशे रुपयांनी घसरले आहेत. उत्पादित साखर कारखान्यांना विक्री करण्यासाठी पोषक वातावरण बाजारपेठेत नाही. त्याचा थेट परिणाम कारखान्यांवर होत आहे. उत्पादित साखरेची विक्री करण्यासाठी योग्य बाजारभाव मिळत नाही, अशी तक्रार आहे. याबाबत देशमुख म्हणाले, राज्यात उत्पादन झालेल्या साखरेपैकी दहा लाख मेट्रिक टन साखर राज्य शासनाकडून खरेदी करण्यात येईल. प्रति क्विंटल तीन हजार दोनशे रुपये या दराने ही खरेदी होईल. विपणन महासंघाकडून (मार्केटिंग फेडरेशन) ही खरेदी होणार असून, त्या बाबतचा प्रस्ताव साखर आयुक्तांनी राज्य शासनाला दिला आहे. या आठवडयात त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
यंदा साखरेचे उत्पादन वाढले
राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी सांगितले की, राज्यातील साखर शासनाने विकत घ्यावी, ती कारखान्यांच्याच गोदामात ठेवून योग्य वेळी तिची विक्री करावी, असा प्रस्ताव साखर उत्पादकांकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यावर निर्णय झालेला नाही. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन वाढले असले, तरीही हे उच्चांकी उत्पादन नाही. यापूर्वीही राज्यातून या पेक्षाही अधिक साखर उत्पादन झाले आहे, असे साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात अठरा लाख मेट्रिक टन जास्त साखरेचे उत्पादन होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.