नवी दिल्ली । भारतावर पॅरिस पर्यावरण करारातून बाहेर पडताना टीका करणार्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटीबद्ध असल्याने आम्ही या करारात सामील झालो असे सांगत पैशांसाठी किंवा अन्य लाभासाठी आम्ही पॅरिस करारावर स्वाक्षरी केली नव्हती असे स्वराज यांनी म्हटले आहे. पॅरिस करारावरुन भारत- अमेरिका संबंधांवर परिणाम होणार नाही असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. यासंबंधात स्वराज यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत चीन, पाकिस्तान आणि परराष्ट्र धोरणावर भाष्य केले.
पर्यावरणाचे रक्षण करणे हे भारताच्या संस्कृतीमध्येच आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. पॅरिस पर्यावरण करारातून बाहेर पडताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीका केली होती. पण याचे भारत- अमेरिका संबंधांवर परिणाम होणार नाही असे स्वराज यांनी स्पष्ट केले. एच 1 बी व्हिसा नियमातील बदल हाभारतासाठी चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील सर्वोत्तम नेत्यांमध्ये स्थान दिले जात असून जागतिक पटलावर भारत महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे स्वराज यांनी सांगितले.
यावेळी स्वराज म्हणाल्या, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याने त्यासंदर्भात तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही. कझाकस्तानमध्ये होणार्या परिषदेत शरीफ आणि मोदी यांच्यात भेट होण्याची चर्चा होती. पण अद्याप दोन्ही बाजूंनी या भेटीविषयी काहीही ठरलेले नाही असे स्वराज म्हणाल्या. यावेळी त्यांनी एनएसजीसाठी चीनचे समर्थन मिळावे यासाठी चर्चा सुरु असल्याचे सांगितले. तसेच भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा मुद्दा चीनसमोर उपस्थित करु असेही त्यांनी नमूद केले. तामिळनाडू आणि केरळमधील मच्छीमारांच्या प्रश्नावर श्रीलंकेसोबत चर्चा सुरु असल्याचे स्वराज यांनी म्हटले आहे.