हैदराबादमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट बहरावे

0

हैदराबाद : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनने मंगळवारी हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या (एचसीए) अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. यापूर्वी अर्शद अयूबने लोढा समितीच्या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अर्ज दाखल केल्यानंतर त्याने सांगितले की, ‘हैदराबादचे क्रिकेटवर लक्ष नाही. रणजी ट्रॉफीमध्ये आम्ही तळातून दुसऱ्या स्थानी आहोत. हैदराबादमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट बहरावे, असे मला वाटते.’

अद्यापही पेन्शन मिळत नाही
बीसीसीआयने अद्याप त्याच्यावरील आजीवन बंदीचा निर्णय अधिकृतपणे रद्द केलेला नाही. माजी खेळाडूंना मिळणारे पेन्शन त्याला अद्याप मिळालेले नाही. अझहर आपल्या समर्थकांसह एचसीएच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आला होता. त्याच्याकडे निवडणूक लढविण्यास पात्र असल्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. एचसीएची निवडणूक मे महिन्याच्या अखेरच्या रविवारी होते, पण अझहरकडे निवडणूक १७ जानेवारीला व्हावी, असा आदेश होता. गेल्या रणजी मोसमात अझहरुद्दीन सीमारेषेबाहेर विदर्भाच्या खेळाडूंसोबत चर्चा करताना दिसला. त्यावर आक्षेप घेतना बीसीसीआयने डीडीसीएला पत्र लिहिले होते. सामनाधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेतली होती.