स्पर्धेच्या युगात विद्यार्थी घडविण्यासाठी शैक्षणिक कार्य प्रेरणादायी

0

शिरपूर : स्पर्धेच्या युगात विद्यार्थी घडविण्यासाठी एस.व्ही.के.एम. स्कूलच्या माध्यमातून होणारे शैक्षणिक कार्य खूपच प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांना अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे दालन सुरु केल्याची बाब आनंददायी असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेचे योगदान कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत दिल्या जाणार्‍या अत्याधुनिक सोयीसुविधांमुळे विद्यार्थी व पालक निश्‍चितच नशीबवान आहेत असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक एस.चैतन्या यांनी केले.

वार्षिक क्रीडा मेळावा
मुंबई येथील श्री विलेपार्ले केलवणी मंडळ संचलित धुळे येथील एस.व्ही.के.एम. स्कूलमध्ये प्री-प्रायमरी स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी दि.७ जानेवारी रोजी वार्षिक क्रीडा मेळावा घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी धमाल करुन मनमुराद आनंद लुटला. धुळे येथील जिल्हा पोलिस अधिक्षक एस.चैतन्या यांच्या हस्ते वार्षिक क्रीडा मेळावा संपन्न होऊन गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष आ.अमरिशभाई पटेल, भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथे एस.व्ही.के.एम. स्कूलची निर्मिती गेल्या वर्षी करण्यात आली असून अतिशय नावीन्यपूर्ण असे शिक्षणाचे दालन धुळेकरांसाठी सुरु करण्यात आले आहे.

मनोरंजक कार्यक्रम प्रस्तुती
या स्कूलच्या वार्षिक क्रीडा मेळाव्यात विद्यार्थी व पालकांसाठी विविध खेळ, गंमतीदार खेळ, मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक एस.चैतन्या, मुंबई सी.एन.एम. इंटरनॅशनल स्कूलच्या डायरेक्टर गिरीजा मोहन, सी.एन.एम. इंटरनॅशनल स्कूलच्या उपप्राचार्या शरील मुकथ, धुळे डिसान अ‍ॅग्रो लि. डायरेक्टर डॉ.अजय पसारी, डिसान अ‍ॅग्रो लि. डायरेक्टर संतोष अग्रवाल, डिसान अ‍ॅग्रो लि. डायरेक्टर अजय अग्रवाल, स्कूलच्या प्राचार्या सौ.सुनंदा मेनन उपस्थित होते.

विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
प्रास्ताविक स्कूलच्या प्राचार्या सौ.सुनंदा मेनन यांनी केले. प्रमुख पाहुणे व पालकांचे स्वागत करण्यात आले. नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. सामुहिक कवायत सादरीकरण व विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. पालकांनीही विविध खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला. गुणवंत यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या सौ.सुनंदा मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली शैला शेट्टी, पंक्ती मोमया, जागृती सोनार, सिल्वीया जानवे, ग्रेस सिंह, प्रिया महेश, बार्बरा डीसुजा, निलिमा गावंडे, कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.