मुक्ताईनगर । शहरातील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मिळण्याकरीता सत्ताधारी पक्षालासुध्दा आंदोलन करावे लागत असल्याचा प्रत्यय गुरुवार 12 रोजी पहावयास मिळाला. भाजपातर्फे तहसिलदारांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकार्यांची मागणी निवेदनात करण्यात आली. गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेला कणा म्हणून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाकडे पाहिले जाते मात्र येथील रिक्त जागांमुळे आरोग्य सेवेला घर-घर लागली आहे.
याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांना खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात त्वरीत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन द्यावे. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपातर्फे देण्यात आला आहे. यासंदर्भात हिवाळी अधिवेशनात आरोग्यमंत्र्यांची आमदार एकनाथराव खडसे यांनी भेट घेतली होती व येथील रिक्त जागा भरण्याबद्दल आरोग्य मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले होते. त्यानंतर तातडीने डॉक्टर मिळण्याचे संकेत दिले होते. दररोज 240 ओपीडी गेल्या वर्षभरापासून येथील रुग्णालयात करण्यात आले होते.