धायरी । महापालिकेत समावेश करण्यात आलेली 11 गावे आणि तीन वर्षांत समावेश करण्यात येणार्या 23 अशा सर्व 34 गावांचा विकास आराखडा त्वरित तयार करण्यात यावा, अशी मागणी हवेली तालुका नागरी कृती समितीने केली आहे.
यासंदर्भात हवेली तालुका कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त तसेच महापालिकेला निवेदन दिले आहे. हवेली तालुका कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. दाट लोकवस्तीचे उपनगर असलेल्या उत्तमनगर, शिवणे, धायरी आदी 11 गावांचा पालिकेत समावेश करण्यात आला आहे. उर्वरित 23 गावांचा पालिकेत टप्प्या-टप्प्याने तीन वर्षांत समावेश केला जाणार आहे. या गावांचा विकास आराखडा कोणी करायचा, यासाठी पीएमआरडीए व महापालिकेत एकमत नाही. त्यामुळे गावांचा विकास आराखडा रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनियोजित विकासाअभावी या गावात बकालीकरण वाढणार आहे. रस्ते, पाणी, आरोग्य आदी समस्या गंभीर होणार आहेत. दाट लोकवस्तीच्या या गावांच्या विकासासाठी सरकारने स्वतंत्र समिती स्थापन करून तातडीने विकास आराखडा मंजूर करण्याची गरज आहे.
विकास कामांना जागा नाही
या गावांमध्ये सांडपाणी, मैलापाणी मुठा नदीत, रस्त्यावर तसेच ओढ्या नाल्यात उघड्यावर सोडले जात आहे. रस्ते अरूंद आहेत. अनेक ठिकाणी रस्तेही नाहीत. पाण्याची व कचर्यांची समस्या गंभीर आहे. मोठ्या सोसायट्या, दाट लोकवस्त्या चोहोबाजूंनी आहेत. सार्वजनिक जागा नसल्याने कचरा प्रक्रिया, सार्वजनिक स्वच्छतागृह, गार्डन आदी विकास कामांना जागा नसल्याचे गंभीर स्थिती बहुतेक गावांत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.