34 हजार होमगार्डला कामावरून काढले

0

मुंबई:- निष्काम सेवा असे ब्रीदवाक्य असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांवर अन्याय होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कुठलेही अधिकार नसताना आणि अधिनियमात नसताना राज्यभरात 34 हजार होमगार्ड अर्थात गृहरक्षक दलाच्या जवानांना अचानक कामावरून काढल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच 8 महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने या जवानांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातून आलेल्या होमगार्ड जवानांनी सेवेत परत घेण्याबाबत सेना भवनात येऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घातले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या जवानांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी होमगार्डनी ठाकरे यांना निवेदन देखील दिले.

काय आहे प्रकरण?
12 ते 20 वर्षांपेक्षा अधिक काळ निष्काम सेवा बजावलेल्या होमगार्ड जवानांना कामावरन काढून टाकले जात असल्याचे पत्र दिले जात आहे. नवीन भरती करण्याच्या नावावर प्रदीर्घ सेवा बजावणाऱ्या होमगार्डस वर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 2010 साली 12 वर्ष सेवा दिलेल्यांना काढून टाकायचा शासन आदेश आला होता. मात्र आतापर्यंत काहीच कारवाई नाही. 7 वर्षानंतर कारवाई का? असा सवाल होमगार्ड करत आहेत. गेल्या गणपतीच्या ड्युटीचा भत्ता अजून मिळालेला नाही, असे होमगार्डनी सांगितले.

‘उपासमारीची वेळ, पोरांना शिकवायला पैसे नाहीत’
:- यावेळी मुंबईसह पुणे, रायगड, अकोला, वर्धा, सोलापूर, जळगाव, नागपूर आदी ठिकाणावरून होमगार्ड आले होते. वेतन 8 महिन्यापासून न झाल्याने उपासमारीची वेळ आली असल्याचे महिला जवानांनी सांगितले. तसेच पैसे नसल्यामुळे पोरांना शिक्षणासाठी देखील वंचित राहावे लागत असल्याचे पाणावल्या डोळ्यांनी या महिला जवान सांगत होत्या. नोकरी गेल्यामुळे गृहरक्षक दलाच्या जवानाने गडचिरोली येथे आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली. यावेळी महिला होमगार्ड मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. आपली आपबीती सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

आम्ही असलेल्या सरकारात होमगार्ड जवानांची अशी अवस्था आहे. कुठलाही दोष नसताना होमगार्डवर अन्याय झालाय. यांच्यासाठी उद्याच मी यांच्या प्रमुखांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांना न्याय मिळेल यादृष्टीने चर्चा करू.
रामदास कदम,
पर्यावरण मंत्री

अधिकार नसताना आणि आमची काही चूक नसताना कामावरून काढले आहे. अधिनियमात ह्या गोष्टी नाहीत. भत्ते वेळेवर मिळत नाहीत, तरीही आम्ही सेवा बजावतो. 20 वर्ष सेवा केल्यानंतर आता या वयात आम्हाला कुठे नोकरी मिळणार? आम्हाला सेवेत घ्यावे हीच आमची मागणी आहे.
राजश्री लाखन
अध्यक्ष, मुंबई महिला होमगार्ड संघटना

पेमेंट वेळेवर नाही. 8 महिन्यापासून पगार नाही त्यामुळे उपासमारीची वेळ आलीय. मुलांना शिक्षणाच्या अडचणी येताहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक निर्णय नाही झाला तर मोठे आंदोलन करणार आहोत.
अशोक घोडकर,
होमगार्ड अधिकारी

आकडेवारी
महाराष्ट्रात 34000 होमगार्ड
मुंबई 7500 होमगार्ड