जळगाव : महानगर पालिकेच्या प्रशासकीय आवारात बेशिस्तपणे पार्कींग करण्यात येत असल्याने आयुक्त जीवन सोनवणे पार्कींगच्या पट्ट्यांची आखणी करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या होत्या. यात आयुक्त सोनवणे यांनी महानगर पालिकेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी कामपूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, पार्कींगची आखणी सकाळी महापालिका सुरु होण्यापूर्वी पूर्ण करण्यास सांगून देखील केली नाही म्हणून आयुक्त जीवन सोनवणेे यांनी संबधित अधिकारी यांना पार्कींगच्या ठिकाणी बोलावून घेत त्यांची कान उघाडणी केली. यावेळी त्यांनी मक्तेदाराला तात्काळ बोलावून काम करण्याच्या सूचना दिल्यात.
मक्तेदाराला दिली तंबी
महानगर पालिकेच्या प्रसाकीय सतरा मजली इमारतीच्या प्रांगणातील बेशिस्त पार्कींगला शिस्त लावण्यांसाठी वाहने उभी करण्यासाठी ठळक पट्टे आखण्याच्या सूचना आयुक्त जीवन सोनवणे यांनी शहर अभियंता दिलीप थोरात यांच्यासह आस्थापना अधिक्षक राजेंद्र पाटील यांना केल्या होत्या. शहर अभियंता यांनी यासाठी अभियंता सोनगीरे यांना सांगीतले होते. आयुक्तांनी गुरुवारी सकाळी महापालिकेच्या कार्यालयीन वेळ 10:30 च्या आधी हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मात्र दुपारी 12 वाजेपर्यंत देखील आखणीचे काम सुरु करण्यात आले नव्हते. आखणीसाठी कर्मचारी व नागरिकांना वाहने देखील तेथे लावू दिली जात नव्हती. आयुक्त सोनवणे हे प्रागंणात आल्यानतंर त्यांनी राजेंद्र पाटील, शहर अभियंता, अभियंता सोनगिरे यांना बोलवून त्यांना या प्रकाराबद्दल सुनावले. हे काम सकाळी 10:30 वाजेपूर्वी का झाले नाही म्हणून त्यांनी अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. मक्तेदार कय्यूम शेख यांस देखील समज दिली. अखेर दुपारी तात्काळी कामागार बोलवून घेत मक्तेदाराने पट्टे मारण्याचे काम सुरु केले.