जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागितली मदत : ६ लाख ४१ हजार ३४५ शेतकरी बाधित
जळगाव : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बाधित झालेल्या 6 लाख 41 हजार 345 शेतकर्यांसाठी जिल्हा प्रशासनाने 643 कोटी 64 लाख 52 हजार 323 रूपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. काल रात्री उशिरा सर्व तालुक्यांनी माहिती पाठविल्यानंतर हा प्रस्ताव तयार करण्यात येऊन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ आणि जिल्हा कृषी अधीक्षकांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आला आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच तालुक्यांतील शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. कापूस, ज्वारी, बाजरी, मका, कांदा, केळी या पिकांचे आतोनात नुकसान झाले. कापसाला बोंड फुटल्यानंतर पाऊस आल्याने कपाशीचे बोंडे जळाली, ज्वारी काळी पडली, मका व अन्य पिके काढून ठेवल्यानंतर अतिवृष्टी झाल्याने त्यावर बुरशी आली आहे. यामुळे कपाशीचा दर्जा खालावला आहे.
प्रशासानकडून ६४३ कोटीचा प्रस्ताव
जिल्हा प्रशासनाने ६ लाख ४१ हजार ३४५ शेतकर्यांसाठी ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार ३२३रूपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. राज्यात सत्तास्थापनेचा खेळ सुरू आहे. शेतकरी वार्यावर असल्याचे चित्र सध्या राज्यात आहे. त्यामुळे मदत कुणाकडे मागावी असा प्रश्नच शेतकर्याला पडला आहे. तरी याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून शेतकर्याला उभे करण्यासाठी त्वरीत आर्थिक मदत जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी संख्या आणि मदतीची रक्कम
फळपिक सोडून जिरायती
शेतकरी ४ लाख २८ हजार ५२९, रक्कम – ३१७ कोटी २३ लाख २५ हजार ५२८
फळपिक सोडून बागायती
शेतकरी २ लाख २३ हजार ४२, रक्कम – ३०७ कोटी ७१ लाख ४४ हजार ७७५
फळपिका खालील बाधित क्षेत्र-
शेतकरी १० हजार ४७४, रक्कम १८ कोटी ६९ लाख ८२ हजार २० रूपये
एकूण- शेतकरी ६ लाख ४१ हजार ३४५ , रक्कम ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार ३२३रूपये