संशोधनावर खर्च करणारे विकसित

0

जळगाव । देशाच्या सकल उत्पन्नांचा अधिक खर्च ज्या देशात संशोधनावर केला जातो तो देश अधिक विकसित होतो असे प्रतिपादन अटल बिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. मोहनलाल छिपा यांनी अविष्कार संशोधन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले. विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेला गुरुवार पासून विद्यापीठात प्रारंभ झाला. कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी बी.सी.यु.डी. संचालक प्रा. पी.पी. माहुलीकर, जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचे समन्वयक प्राचार्य डी.एस. सुर्यवंशी, डॉ. प्रिती अग्रवाल, डॉ.सी.पी. सावंत, डॉ. एस.आर. चौधरी तसेच या संपूर्ण स्पर्धेचे समन्वयक प्रा. अनिल डोंगरे, उपसमन्वयक प्रा. एस. आर. कोल्हे यांची मंचावर उपस्थिती होती.

इंग्रजांनी संस्कृती, भाषांवर घातला घाला
प्रा. छिपा यांनी पुढे सांगितले की, प्राचीनकाळी भारताची विश्वगुरु म्हणून जगभर ओळख होती. इंग्रजांनी या देशावर राज्यकेल्यावर भारताची संस्कृती आणि भाषा यांच्यावर त्यांनी घाला घातला. इंग्रजी शिक्षण पध्दतीत पदवीचा संबंध नोकरीशी जोडला गेला त्यामुळे राष्ट्रभक्ती मागे पडली असे सांगून प्रा. छिपा यांनी भारताच्या पूर्वज्ञान संस्कृती आणि परंपरेचा तरुण पिढीने शोध घ्यावा, त्यावर संशोधन करावे असे आवाहन त्यांनी केले.

संशोधनाची स्थिती चिंताजनक
प्रा. छिपा म्हणाले की, भारतात संशोधनाची स्थिती चिंताजनक आहे. इस्त्रायल सारखा छोटा देश सकल उत्पन्नाच्या 4.27% खर्च संशोधनावर करतो, फिनलँड 4%, स्विडन 3 %, जपान 3.5% आणि भारतात केवळ 0.87% संशोधनावर खर्च केला जातो. डॉलरमध्ये सांगायचे तर डेन्मार्क 1636 डॉलर खर्च प्रती व्यक्ती करते तर भारतात प्रती व्यक्ती 9 डॉलर खर्च होतो. भारतात 10 लाख लोकसंख्येमागे केवळ 164 लोक संशोधन करतात अशीही आकडेवारी त्यांनी दिली.