मुंबई । नजरचुकीने पाकिस्तानी हद्दीत शिरलेले मूळचे जळगाव जिल्ह्यातील तर हल्ली धुळे जिल्ह्यातील निवासी असणारे जवान चंदू चव्हाण हे सुरक्षित असल्याची माहिती आता समोर आली आहे. पाकिस्तानने चंदू चव्हाण सुरक्षित असल्याची माहिती दिली असून त्यांना भारतात सुरक्षितपणे आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आज संरक्षण राज्यमंत्री ना. सुभाष भामरे यांनी दिली. यामुळे चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला असून त्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हालचाली सुरू कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सुरुवातीला चंदू चव्हाण आपल्या भूमीत आलेच नसल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र त्यानंतर चंदू चव्हाण पाकिस्तानातच असून त्यांची चौकशी सुरु असल्याची कबूली दिलीय. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात डीजीएमओ स्तरावरील चर्चा सुरु आहे. 15 ते 20 वेळा ही चर्चा झाली असून पहिल्यांदाच पाकिस्तानकडून चंदू चव्हाण यांच्या सुटकेबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिलीय.
पुढील हालचालींवर लक्ष
चंदू चव्हाण यांना भारतात आणण्यासाठी दोन्ही देशांमध्ये बोलणीची गरज आहे. आंतरराष्ट्रीय नियमानुसार अशा प्रकार सीमेत आलेल्या जवानांची अदलाबदल होत असते. यानुसारच चव्हाण यांना भारतात आणले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमिवर खुद्द संरक्षण राज्यमंत्री ना. सुभाष भामरे यांनी या प्रकरणी पाठपुरावा केल्यामुळे आता बोलणी गतीमान होणार असल्याची शक्यता आहे. या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये काय घडामोडी होतात? याकडे लक्ष लागून आहे.
‘सर्जिकल स्ट्राईक’ दरम्यान सीमारेषा केली होती पार
29 सप्टेंबरला भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त करून तब्बल 38 अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. या घटनेनंतर काही काळातच चंदू चव्हाण यांच्या कडून चुकून पूंछ येथील नियंत्रण रेषा ओलांडली गेली आणि पाकिसात्न्च्या हद्दीत पोहचले. त्यानंतर पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आम्ही भारतीय जवानाला ताब्यात घेतल्याचे सांगितले होते. पण काही दिवसातच पाकिस्तानने घुमजाव केला. आणि चंदू चव्हाण आमच्या ताब्यात नसल्याचे म्हटत घुमजाव केल्यामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला होता. लष्करी जवान चुकून दुसर्या देशाच्या हद्दीत गेल्यास ‘स्ट्रॅटेजिक सोल्जर एक्स्चेंज’अंतर्गत लष्कर कारवाई करत असते. तथापी पाकिस्तानने घुमजाव केल्याने चंदू चव्हाण यांच्या सुटकेबद्दल शंका निर्माण झाली होती. नंतर मात्र चव्हाण यांना इस्लामाबादमध्ये ठेवण्यात आल्याचे पाकिस्तानचे लष्करी कारवाई प्रमुख (डीजीएमओ) यांनी सांगितले होते.
संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा पुढाकार
बोरविहिरचे रहिवाशी चंदू चव्हाण लवकरच आपल्या मातृभुमीत परण्याची आशा वाढली आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी स्वतः जवान चंदू चव्हाण यांच्या परिवाराला ही माहिती दिली आहे. आवश्यक ते सोपस्कार भारत सरकारकडून पुर्ण करण्यात आल्यावर जवान चंदू चव्हाण यास भारतात परत आणणार असल्याचे ना.डॉ.सुभाष भामरे यांनी म्हटले आहे.
ना. डॉ.भामरे यांच्या प्रयत्नांमुळे आपला मुलगा लवकरच आपल्या घरी येईल असे समाधान चंदू चव्हाण यांच्या कुंटूबियांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात ना. भामरे म्हणाले की, ‘दोन दिवसांपुर्वी पाकिस्तानच्या डिजिएमओेंशी बोलणे झाले आणि त्यात पहिल्यांदाच पाकिस्ताननी सैन्य अधिकार्यांनी भारतीय जवान चंदू चव्हाण त्यांच्या ताब्यात असल्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे लवकरच चंदू चव्हाण यांना परत आपल्या मातृभुमीत आणू असा विश्वास वाढला आहे.
कुटुंबियांच्या आशा पल्लवित
चंदू चव्हाण हे 2012 मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांचा मोठा भाऊ भूषणदेखील मिलिट्रीमध्ये आहे. ते सध्या 9 मराठा रेजिमेट कार्यरत आहेत. चंदू चव्हाण लहान असतानाच त्यांच्या डोक्यावरुन आई-वडिलांचं छत्र हरवलं. त्यामुळे चंदू आणि त्याचा भाऊ भूषण यांचं पालनपोषण बोरविहीर (ता.धुळे) येथील आजी-आजोबांनी केलं. आजी-आजोबा भूषण चव्हाण यांच्यासोबत गुजरातमधील जामनगर इथे राहतात. तर चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचं वृत्त आल्यानंतर आजीचं धक्क्याने निधन झालं. यामुळे मोठा भाऊ भूषण याने चंदू आल्यानंतरच आजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येईल असा संकल्प केला आहे. आता चंदू यांच्या परतीच्या अपेक्षा निर्माण झाल्यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.