पुणे : भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज आणि उमदे नेतृत्व विराट कोहलीची कर्णधार होण्याची हीच योग्य वेळ होती असे सांगत महेंद्रसिंग धोनीने विराटवर स्तुतिसुमने उधळली. सोबतच कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीला वेळोवळी सल्ला देत राहीन असेही धोनीने सांगितले. कर्णधारपद सोडल्यानंतर पहिल्यांदाच इंग्लंडसोबतच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी धोनीची पत्रकार परिषद पार पडली. धोनी पुढे म्हणाला की, ‘कर्णधारपदाची जबाबदारी निभावताना अनेक आनंदाचे आणि कठीण क्षणांना सामोरे जावे लागले. एकूणच हे सर्व एका प्रवासाप्रमाणे होते’, अशी भावना धोनीने व्यक्त केली आहे. कोणी मान्य करो अथवा नको, पण विकेटकीपर संघात नेहमी उप-कर्णधाराची भूमिका निभावत असतो. तो नेहमी कर्णधाराला सल्ला देत असतो. याचप्रमाणे मीदेखील विराट कोहलीला योग्य सल्ले देत राहीन असे धोनीने सांगितले. ‘मला नेहमी नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी द्यायची होती. यामुळेच मी नेहमी खालच्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी यायचो. संघाच्या प्रदर्शनासमोर वैयक्तिक रेकॉर्ड महत्वाचा नसतो’, असेही धोनीने म्हटले.
आक्रमक अंदाजात धोनी फलंदाजी करेल
महेंद्रसिंह धोनीने संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला असला तरी तो संघाचा सहभागी खेळाडू असणार आहे. त्यामुळे धोनी कर्णधार नसला तरी तो सामन्यात आपल्या बेधडक अंदाजात फलंदाजी करताना पाहायला मिळेल अशी आशा अजिंक्य रहाणे याने व्यक्त केली आहे. रहाणे म्हणाला की, संघाचा कर्णधार म्हणून आम्ही धोनीची नक्कीच उणीव भासेल त्याच्या अनुभव नक्कीच आम्हाला उपयोगी ठरणार आहे. पण कर्णधारी जबाबदारीतून धोनी मोकळा झाला असल्याने त्याला पुन्हा एकदा आपल्या जुन्या रुपात फलंदाजी करताना मला पाहायचे आहे असेही रहाणे म्हणाला.