35 हजारांची लाच भोवली : ग्रामविकास अधिकार्यासह जि.प.तील वरीष्ठ शिक्षण सहाय्यक धुळे एसीबीच्या जाळ्यात
धुळे/भुसावळ : 35 हजारांची लाच स्वीकारताना धुळे तालुक्यातील महिला ग्रामविकास अधिकार्यासह जिल्हा परीषदेतील वरीष्ठ शिक्षण सहाय्यकास धुळे एसीबीच्या पथकाने राहत्या घरीच अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. शिरडाणे, ता.धुळे येथील ग्रामविकास अधिकारी जयश्री हरिश्चंद्र पाटील (39) तसेच धुळे जि.प.च्या शिक्षण विभागातील वरीष्ठ सहाय्यक संदीप नथू पाटील (44, रा.प्लॉट नंबर 14, राका पार्क हायस्कूल जवळ, वलवाडी, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. उभय आरोपी दाम्पत्य आहेत.
लाच स्वीकारताच केली अटक
37 वर्षीय पुरूष तक्रारदार यांचे मौजे शिरडाणे, ता.धुळे येथे सिटी सर्वे नंबर 842 एकूण क्षेत्र 250 मीटर हा प्लॉट खरेदी केला आहे. खरेदी केलेल्या प्लॉटची ग्रामपंचायत कार्यालयात नोंद होऊन प्लॉटचा 8 अ चा उतारा मिळण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे वरील आरोपींनी 16 रोजी लाचेची मागणी केली होती. या संदर्भात एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवार, 17 रोजी सायंकाळी राहत्या घरीच लाच स्वीकारली व पंचांसमक्ष आरोपींना अटक करण्यात आली.
या कारणास्तव पतीही अडकला जाळ्यात
तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. लाचखोर महिला ग्रामविकास अधिकारी जयश्री पाटील यांनी तक्रारदारास धुळ्यातील वलवाडीजवळील आपल्या निवासस्थानीच लाच देण्यासाठी बोलावल्यानंतर एसीबीने तयारीनिशी सापळा रचला. लाचेची 35 हजारांची रक्कम जयश्री यांनी स्वीकारल्यानंतर ती पती संदीप पाटील यांच्याकडे मोजण्यासाठी दिली व पतीनेदेखील लाचेची संपूर्ण रक्कम मोजून ती 35 हजार रुपये असल्याचे संवाद पत्नीशी साधला व एसीबीने लाचखोर महिलेच्या पतीलाही बेड्या ठोकल्या.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, कैलास जोहरे, शरद काटके, राजन कदम, कृष्णकांत वाडीले, पुरुषोत्तम सोनवणे, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, संदीप कदम, महेश मोरे,गायत्री पाटील, चालक सुधीर मोरे, बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.