350 गावांमध्ये सुरू होणार नागरी सुविधा केंद्र

0

पुणे । ग्रामीण भागातील नागरीकांना विविध प्रकारच्या नागरी सेवा, सुविधा व योजनांचा तातडीने सर्वांना लाभ मिळावा, या प्रमुख उद्देशाने केंद्र शासनाने ई-गव्हर्नर आणि डिजिटल इंडिया अंतर्गत कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) अर्थात नागरी सेवा केंद्र सुरू करण्याचे धोरण आखले आहे. या केंद्रातील योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगाराचे साधन प्राप्त होण्यास निश्‍चित मदत होणार असून, पुणे जिल्ह्यातील निवडक 350 गावांमध्ये हे केंद्र सुरू करण्यासाठी लक्षांस देण्यात आले आहे, अशी माहिती सीएससी पुणे जिल्हा व्यवस्थापक निलेश धांडे यांनी दिली.

45 सेवांचा लाभ
सीएससीच्या माध्यमातुन एकूण 35 ते 45 सेवांचा प्राधान्याने लाभ दिला जातो. यात वाहन परवाना, पिका विमा, जीवन प्रमाण, सर्व विमा, शैक्षणिक आदी विविध प्रकारच्या सेवा, सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, केंद्र चालवण्यासाठी एक व्हिलेज लेवल इंटरप्रिनरशीप अर्थात व्हीएलई म्हणून युवक व युवतींची नियुक्ती केली जाणार आहे. सीएससी केंद्रासाठी आवश्यक असलेल्या बाबींमध्ये गावात 100 चौरस फूट जागा (स्वतःची किंवा भाडे तत्वावर) एक संगणक, प्रिंटर, इंटरनेट सेवा अत्यावश्यक आहे, असे निलेश धांडे यांनी स्पष्ट केले. खेड – 56, जुन्नर – 39, भोर – 90, मुळशी – 52, वेल्हे – 59 असे इतर तालुकानिहाय लक्षांस देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये सीएससी केंद्र देण्यात येणार आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण किंवा तत्सम कुठल्याही शाखेचा पदवीधर अथवा संगणक प्रशिक्षक पात्र युवकाची यामध्ये निवड केली जाणार आहे.
– निलेश धांडे
जिल्हा व्यवस्थापक, सीएससी