मुंबई/पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीतील चर्चेसाठी शिवसेना अन् भाजपला आता मकर संक्रांत आडवी आली आहे. 15 जानेवारीनंतरच युतीसाठी बोलणी सुरु होतील, असे संकेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत. तर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले आहेत. भाजपही हेवेदावे मागे ठेवणार नाही, असेही भाजपचे खासदार अमर साबळे यांनी सांगितले. तसेच, ठाणे आणि पुण्यात होणार्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्यास स्थानिक भाजपनेत्यांनी प्रचंड विरोध केला आहे. तर नागपूरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी भाजपसोबत युती करण्यास विरोध केला आहे. स्थानिक पातळीवर पदाधिकार्यांचा युती करण्यास विरोध असला तरी, वरिष्ठ पातळीवरून दोन्ही नेतेही युती करण्यास अनुकूल आहेत, असे संकेत मिळत आहेत.
संक्रातीनंतर चर्चेचे गुर्हाळ चालणार..
मुंबईसह राज्यभर थंडीचा कडाका वाढला असला तरी, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाल्याने पक्षाच्या नेत्यांचा उत्साह दुपटीने वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रच जिंकायचा असा चंग नेत्यांनी बांधला आहे. दुसरीकडे शिवसेनेने मुंबईवर भगवा फडकावयचाच असा निर्धार केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये युतीबाबत चर्चेचे गुर्हाळ सुरू होते. युतीची चर्चा सुरू होईल, असे वाटत असतानाच आता ही चर्चा पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. मकर संक्रांत अशुभ असल्याचा समज आहे. त्यामुळे संक्रांत होईपर्यंत चर्चा होणार नाही, अशी भूमिका दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तूर्तास तरी ही चर्चा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, 15 जानेवारीनंतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये युतीच्या चर्चेला सुरूवात होईल, असे सांगण्यात येत आहे.
युतीबाबत शिवसेना नेत्यांचा खल!
ठाण्यातील भाजपनेत्यांनी शहरात जागोजागी फलक लावून युती नको असे स्पष्टपणे जाहीर केले होते. तर गुरुवारी भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांनी स्वबळाचाही नारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर युतीबाबतचा निर्णय स्थानिक पदाधिकारीच घेतील, असा सावध पवित्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. त्यानंतर युतीबाबतच्या चर्चेसाठी भाजपकडून तीन तर शिवसेनेकडून तीन नेते जातील, असे सांगितले जात होते. युतीचा निर्णय जागावाटपावर अवलंबून असेल, अशी चर्चा सुरू असतानाच, मकर संक्रांतीमुळे ही चर्चा दोन दिवस लांबणीवर गेली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून युतीसंदर्भात अधिकृत प्रस्ताव आला असून, संक्रातीनंतरच युतीची बोलणी करू, असे शिवसेना नेते अनिल देसाई यांनी सांगितले. मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात शिवसेना भवनात एक बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे आमदार सहभागी झाले होते. त्यात युतीवर संक्रांतीनंतर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजपच्या गोटातही जोरदार खलबते
भाजपच्या गोटातदेखील युतीबाबत जोरदार खलबते सुरु आहेत. जिल्हा परिषद, महापालिका अन् पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पालकमंत्री, जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्री यांची मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गुरुवारी रात्री दोन वाजेपर्यंत बैठकांचे सत्र सुरु होते. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून शिवसेनेसोबत युती करावी, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. युती करताना फक्त 2012च्या निवडणुकांच्या फॉर्म्युल्यानुसार नाही तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची जी ताकद वाढली त्या आधारावर जागा वाटप व्हावे, असा आग्रह या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी धरला होता.