चाळीसगाव । गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी सभासद, कामगार व तालुकावासिय आणि राजकारणाचे लक्ष लागून असलेल्या बेलगंगा सहकारी साखर कारखाना खरेदीचे टेंडर ई-निवीदा ऑनलाईनप्रमाणे चाळीसगावच्या भूमीपुत्रांना म्हणजेच अंबाजी कंपनीने जास्त बोली लावल्याने मिळण्याची शक्यता बळावली आहे. मकरसंक्रांतीच्या पुर्वसंधेला तालुकावासियांना गोड बातमी मिळाली असून तशा आशयाची माहीती बेलगंगेचे चेअरमन चित्रसेन पाटील, व्हा. चेअरमन रविंद्र पाटील यांचेसह त्यांचे 14 सहकार्यांनी शुक्रवारी 13 जानेवारी 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता येथील चित्रसेन पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
14 जणांनी अंबाजी कंपनीच्या नावे भरले ई-टेंडर
बेलगंगा सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी मागील महिन्यात माझ्यासह रविंद्र पाटील व सहकार्यांनी शेतकरी सभासद यांना सोबत घेऊन प्रत्येकी 1 लाख रूपये टाकून जवळपास 100 कोटी रूपये जिल्हा बँकेला भरून कारखाना चालवू असे ठरवल्यानंतर तालुकाभरातून शेतकरी, सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद मिळाला अनेकजण आमच्या संपर्कात असल्याचे सांगत बेलगंगा विक्रीची निविदा अंतिम तारीख 12 जानेवारी 2017 असल्याने व किमान 4 कोटी रूपये रक्कम बोली लावण्यासाठी भरावयाची चेअरमनसह संचालक मंडळांनी व सहकारी मित्र असे एकूण 14 जणांनी अंबाजी कंपनीच्या नावे टेंडर भरून स्वत: 4 कोटी रूपये अनामत रक्कम जमा करून या टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे सांगितले.
राजकीय नेत्यांकडूनही पाठबळ
बोली लावण्याच्या प्रक्रिये पुर्वी आमची टीम माजी मंत्री ना. एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहीणीताई खडसे, संचालक वाडीलाल भाऊ राठोड व राजीवदादा देशमुख यांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. व्हॉट्सअप वर सदर टेंडर हे ठराविक लोकांना मिळाले व ते कारखाना चालविणार अशा उलट-सुलट बातम्या प्रसारित झाल्या होत्या मात्र तसे काहीही नाही. कारखाना हा चाळीसगांवचे भूमीपुत्रच घेणार आहेत, असे सांगत कारखाना टेंडरसाठी आवश्यक 4 कोटी रूपये आपण भरू व टेंडर मिळाल्यानंतर टेंडरचा कागद घेऊन शेतकरी सभासद सर्व सामान्य जनतेला दाखवू मग त्यांच्याकडून ठराविक रक्कम घेऊन कारखाना चालू करू असा शुध्द हेतू आपला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कारखान्याची एकुण 188 एकर जमीन असून त्यावर कारखाना व पेट्रोल पंप आहे. पुर्वी कारखान्यात 600 कर्मचारी होते आत्ता 90 आहेत, काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांना देखील कामावर सामावून घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा बँकेचे 40 कोटी घेण्याचे बाकी : बेलगंगा सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेचा बोजा आहे. जिल्हा बँकेचे यावर जवळपास 40 कोटी रूपये घेणे असून इतर 60 कोटी घेण्यामध्ये कामगारांचा भविष्य निर्वाह निधी, सेल्स टॅक्स, इनकम टॅक्स व कर्मचार्यांची देणी आहेत. रितसर कारखाना आपल्या ताब्यात आल्यानंतर हा विषय पुढे येणार आहे. अशी माहीती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान टन्डर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बेलगंगा साखर कारखान्याचे देसले नामक व्यक्ती या प्रक्रिये विरोधात औरंगाबाद खंडपिठात गेले असल्याचे सांगून कामगारांनी या प्रक्रियेकडे राजकारण म्हणून न पाहता व कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता भूमीपुत्र म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी पत्रकार परीषदेत केले.
सर्वांकडून अभिनंदन : बेलगंगा सहकारी साखर कारखाना खरेदीची प्रक्रिया सुरू करणार्या चेअरमन चित्रसेन पाटील, व्हा.चेअरमन रविंद्र पाटील, दिलीप चौधरी, किरण देशमुख, अजय शुक्ल, निलेश निकम, डॉ. अभिजीत पाटील, अशोक ब्राम्हणकार, निलेश येवले, निशांतकुमार मोमाया, प्रेमचंद खिवसरा, जगदीश पाटील, बाळासाहेब पाटील, यांचे जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, आर.डी.चौधरी, एम.बी.पाटील यांनी पत्रकारांच्या वतीने पुष्प देवून अभिनंदन केले.