एरंडोल । भारतीय जनता पक्षाच्या इतर मागासवर्गीय मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अशोक सुकदेव चौधरी यांच्या मोबाईलवर संदेश पाठवून सात दिवसात जीवे मारण्यात येईल असा संदेश आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अशोक चौधरी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून लवकरच संदेश पाठवणार्या व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांनी सांगितले. खुलेआम अशा प्रकारच्या धमक्या राजकारणी मंडळी व उद्योजकांना येत असल्यामुळे एरंडोल परिसरात व एकूणच जिल्हाभरात चर्चा व्याप्त आहे. दरम्यान अशाच प्रकारचा संदेश युवा उद्योजक राजेंद्र जगन्नाथ यांना देखील आला असून त्यांनीही पोलीस स्टेशनला प्रकरण दिली आहे. या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करुन आरोपींना जेरबंद करण्याची मागणी नागरिक देखील करत आहेत.
उद्योजक डॉ.राजेंद्र चौधरी यांनाही दिली धमकी
भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांच्या मोबाईलवर काल 12 जानेवारी सायंकाळी 5:53 वाजेच्या सुमारास एका मोबाईल क्रमांकावरून तुम्हास सात दिवसांच्या आत जीवे ठार मारण्यात येईल, असा संदेश इंग्रजी भाषेत आहे. तसेच संदेशात त्या व्यक्तीने आपले नाव निलेश संभाजी सोनवणे (रा.तुकाराम वाडी, पांडे चौक जळगाव) असे सांगून पत्ता देखील टाकला आहे. अशाच प्रकारचा संदेश युवा उद्योजक डॉ.राजेंद्र चौधरी यांना देखील काल गुरूवार 12 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता त्यांच्या मोबाईलवर आला आहे. याबाबत माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी, डॉ.राजेंद्र चौधरी यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत. यावेळी पोलीस स्टेशनला भाजपचे एरंडोल लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील, संगायो अध्यक्ष सुनिलभैया पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनला हजर होते. तसेच खासदार ए.टी.नाना पाटील यांनी एरंडोल पोलिस स्टेशनला संपर्क साधुन धमकी देणार्या व्यक्तीचा तपास करून कारवाही करण्याच्या सूचना दिल्या. अशोक चौधरी यांना आलेल्या धमकीचा निषेध केला आहे.