वाढत्या थंडीत रंगणार ‘मुंबई मॅरेथॉन’चा थरार

0

-इथिओपियाची दिनकेंश मेकाश, केनियाचा लेव्ही मॅटेबो यांच्या कामगिरीकडे नजरा
-गारव्याचा खेळाडूंना फायदा होण्याची शक्यता; नोंदविले जाणार नवे विक्रम

मुंबई : मुंबईकर आतुरतेने वाट पाहत असलेली मुंबई मॅरेथॉन शर्यत आज, रविवारी पार पडणार आहे. तापमानात घसरण झाल्यामुळे मुंबईकरांना हुडहुडी भरली असली तरी हा गारवा सहभागी धावपटूंना नवा स्पर्धा विक्रम नोंदवण्याची ऊर्जा देणारा ठरणार आहे. एरवी मुंबईतील तापमानाच्या तक्रारींचा पाढा वाचणारे धावपटू यंदा मात्र आनंदात दिसत आहेत. इथिओपियाची दिनकेंश मेकाश आणि पहिल्यांदाच मुंबईत धावणारा केनियाचा लेव्ही मॅटेबो यांच्या कामगिरीकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून सकाळी ७.२० वाजता पूर्ण मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे.

स्टार खेळाडूंच्या माघारीने हिरमोड
मोनिका आथरे, ज्योती गवते आणि श्यामली सिंग यांच्या रूपाने भारतीय गटातील नवीन विजेती यंदा मिळणार आहे. रिओ ऑलिम्पिकपटू ललिता बाबर, सुधा सिंग, ओ. पी. जैशा व कविता राऊत यांनी मुंबई मॅरेथॉनमधून माघार घेतल्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे. भारतीय पुरुष गटात गतविजेत्या नितेंद्र सिंग रावतच्या अनुपस्थितीत ऑलिम्पिकपटू खेता राम जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

स्पर्धा विक्रम नोंदवण्यासाठी
परदेशी धावपटूंमध्ये जेतेपदाचा दावेदार असलेल्या इथिओपियाच्या आयेले अ‍ॅबशेरोने माघार घेतल्यामुळे २७ वर्षीय मॅटेबो नव्या स्पर्धा विक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झाला आहे. गतवर्षी केनियाच्याच गिडीओन किपकेटरने २ तास ०८ मिनिटे ३५ सेकंदांची वेळ नोंदवून जेतेपदासह स्पर्धा विक्रमही आपल्या नावावर केला होता. मात्र त्याच्या अनुपस्थित मॅटेबोने हा विक्रम मोडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मॅटेबोने २०११ मध्ये फ्रँकफर्ट मॅरेथॉनमध्ये २ तास ५ मिनिटे १६ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली होती.

स्पर्धक : ४२,३७९
पूर्ण मॅरेथॉन : ६,३४२
अर्ध मॅरेथॉन : १४,६६३
ड्रिम रन : १९,९८०
ज्येष्ठ नागरिक : ९२१
दिव्यांग स्पर्धक : ४३३
पोलीस चषक संघ : ४०