– ५ गड्यांनी मुंबईवर केली मात; कर्णधार पार्थिव पटेलच्या १४३ धावांच्या जोरावर ३१२ धावांचा यशस्वी पाठलाग
– तगड्या मुंबईला नमवीत मिळविले ऐतिहासिक विजेतेपद; ढेपाळलेली फलंदाजी, निष्प्रभ गोलंदाजीमुळे मुंबईला पराभव
इंदौर: कर्णधार पार्थिव पटेलच्या दोन्ही डावातील दमदार खेळीच्या बळावर गुजरातने मुंबईवर मात करत ऐतिहासिक विजयाची नोंद करत पहिल्यांदाच रणजी करंडक जिंकला. मुंबईने पहिल्या डावातील कमजोर खेळीच्या नंतर दुसऱ्या डावात गुजरातसमोर 312 धावांचे आव्हान ठेवले होते. शेवटच्या दिवशी खराब सुरुवात झाल्यानंतर पार्थिवने कर्णधाराला साजेशी खेळी करत गुजरातचा डाव सावरला. धावांचा पाठलाग करताना पार्थिव पटेलच्या शानदार (१४३) धावांच्या बळावर गुजरातने मुंबईवर ५ गड्यांनी मात केली. पार्थिवला मनप्रीत जुनेजा (५४) ने अर्धशतक ठोकत चांगली साथ दिली. विजयासाठी अवघ्या १३ धावा बाकी असताना पार्थिव बाद झाला. यानंतर आलेल्या चिराग गांधीने लगातार दोन चौकार ठोकत गुजरातला रणजीचा शिल्पकार केले. पहिल्या डावात ९३ व दुसऱ्या डावात (१४३) धावा ठोकणाऱ्या पार्थिवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पहिल्या डावात ढेपाळलेली फलंदाजी आणि चौथ्या डाव्यात निष्प्रभ ठरलेली गोलंदाजी यामुळे मुंबईला पराभव पत्करावा लागला.
खराब सुरूवातीनंतर ‘कप्तानी पारी’
दुसऱ्या डावात बहरलेल्या फलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४११ धावांची मजल मारली. गुजरातला विजयासाठी ३१२ धावांचे कठीण आव्हान दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर गुजरातने बिनबाद ४७ अशी सुरुवात केली होती. अटीतटीच्या या सामन्यात रेकॉर्ड पाहता मुंबई बाजी मारेल असा अंदाज व्यक्त होत होता. अंतिम दिवशी झालेल्या सुरुवातीवरून असेच संकेत मिळत होते. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच गुजरातने दोन फलंदाज गमावले होते. यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पार्थिवने कर्णधाराला साजेशी खेळी करत गुजरातचा डाव सावरला. सलामीवीर समित गोहिल, प्रियांक पांचाल, मनप्रीत जुनेजा यांना साथीला घेत पार्थिवने गुजरातला पहिल्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावून दिले.
मनप्रीत, राजुलची मिळाली साथ
पाचव्या आणि अखेरच्या दिवसाचा खेळ सुरू होताच मुंबईचा गोलंदाज बलविंदर संधूने दोन फलंदाज बाद करत गुजरातला धक्के दिले. त्यानंतर मैदानात आलेल्या पार्थिव पटेलने सलामीवीर समित गोहिलसोबत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजरातची धावसंख्या ८९ असताना समित बाद झाला आणि गुजरातला तिसरा धक्का बसला. समित गोहिल बाद झाल्यानंतर पार्थिव पटेलने मनप्रीत जुनेजाच्या साथीने संघाला विजयाच्या दिशेने नेले. मनप्रीतसोबत शतकी भागिदारी रचत पार्थिव पटेलने गुजरातला सुस्थितीत नेले. तब्बल ४५ षटके या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. मनप्रीत जुनेजाने अर्धशतकी खेळी करत कर्णधार पार्थिव पटेलला साथ दिली. गुजरातने दोनशे धावाचा टप्पा ओलांडल्यावर अखिल हेरवाडकरच्या गोलंदाजीवर मनप्रीत बाद झाला आणि मुंबईच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र यानंतर राजुल भट्टसोबत ९४ धावांची भागिदारी करत पार्थिव पटेलने गुजरातला विजयाच्या जवळ नेले. गुजरातला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता असताना पार्थिव पटेल बाद झाला.
नायर, तरेची झुंझार खेळी वाया
मुंबईने अभिषेक नायर आणि आदित्य तरे यांच्या जबाबदार फलंदाजीने रणजी चषकाच्या फायनलमध्ये गुजरातसमोर 312 धावांचे आव्हान ठेवले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रियांक पांचाल आणि समित गोहिल या सलामीवीरांनी गुजरातला चौथ्या दिवसअखेर बिनबाद 47 धावांची मजल मारुन दिली होती. रणजी चषकाच्या फायनलवर गुजरातने पहिले दोन्ही दिवस वर्चस्व गाजव. पण मुंबईने तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आपली कामगिरी उंचावून हा सामना दोलायमान केला होता. मुंबईने तिसऱ्या दिवसअखेरच्या तीन बाद 208 धावांवरून दुसऱ्या डावात 411 धावांची मजल मारली. कर्णधार आदित्य तरेच्या 69, श्रेयस अय्यर (82), अभिषेक नायरच्या 91 धावांच्या खेळींनी त्यात मोलाचा वाटा उचलला होता. चिंतन गजाने मुंबईकरांच्या फलंदाजीला खिंडार पाडताना १२१ चेंडूंत सहा बळी घेतले. आरपी सिंगने दोन बळी घेत त्याला चांगली साथ दिली, तर रुष कलारिया आणि हार्दिक पटेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
मुंबईचे स्वप्न अधुरे
पहिल्या डावात सपाटून मार खाल्यामुळे मुंबईला हा पराभव स्वीकारावा लागला. पराभवाचे मुख्य कारण म्हणजे मुंबईच्या फलंदाजांचे अपयश मानले जात आहे. नवखा पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव व अभिषेक नायर वगळता एकही फलंदाज यशस्वी ठरला नाही. सोबतच मुंबईचे गोलंदाज देखील गुजरातची फलंदाजी फोडण्यात अयशस्वी झाली. यामुळे बेचाळिसाव्यांदा रणजी करंडक उंचावण्याचे मुंबईचे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले. नकारात्मक मारा व वेळकाढू धोरण अवलंबणाऱ्या गुजरातला पहिल्यांदा रणजी करंडक जिंकण्याची संधी गुजरातच्या फलंदाजांनी पूर्ण केली. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील चौथा दिवस विजेतेपदाचा कल स्पष्ट करणारा ठरला. गुजरातच्या सर्व प्रतिकाराचा सामना करत मुंबईने 411 धावा केल्या खऱ्या; परंतु पहिल्या डावातील 100 धावांची पिछाडी त्यांच्या पराभवाचे कारण ठरले.