वरणगाव। शहरातील उघड्यावर शौचास बसणार्या नागरीकांमध्ये गुड मॉर्निंग पथकाकडून जनजागृती केली जात असून वैयक्तीक शौचालय बांधकामाच्या सुचना देवून जागेवरच नागरीकांचे अर्ज भरले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्षा अरुणा इंगळे यांसह सर्व नगरसेवकांनी शहर हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला असून पालीकेच्या माध्यमातून 17 कर्मचार्यांचे गुड मॉर्निग पथक तयार करण्यात आले आहे. या पथकांतर्गत उघड्यावर शौचास बसणार्या नागरीकांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्याकरीता प्रोत्साहीत केले जात आहे.
आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरोघरी जावून दिली जाते माहिती
या मागील हेतूनूसार शहरातील स्वच्छता कायम राहावी व दुषीत वातावरण कायम थांबेल तर विविध आजारांच्या म्हणजे आम अतिसार, विषमज्वर, अतिसार, पोटातील जंत, कावीळ, श्वसनाचे आजार, संसर्गजन्य आजार अशा विविध आजारापासुन सुटका होईल. याकरीता शासन स्तरावरून प्रत्येकी 17 हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. गुड मॉर्निग पथकातील कर्मचार्यांसह आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका काम करीत असून नागरीकांना आपआपल्या प्रभागात जावून वैयक्तीक शौचालय बांधणीच्या सुचना देत जनजागृती केली जात आहे.
यांचा आहे समावेश
शौचालय जनजागृतीमुळे विविध आजारांवर आळा बसणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, अशी पालीकेकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. गुड मॉर्निग पथकातील कर्मचार्याकडून उघडयावर शौचास जाणार्या नागरिकांचे जागेवरच फॉर्म भरले जात आहे व त्यांना जनजागृतीवर माहिती दिली जात आहे. पथकात गंभीर कोळी, संजय माळी, दिपक भंगाळे, गणेश कोळी, योगेश भोई, रवी नारखेडे, राजेंद्र गायकवाड, कृष्णा माळी, रविंद्र धनगर आदी कर्मचारी पथकात आहे.
लोका सांगे ब्रह्मज्ञान
शहरातील हगणदारीचा प्रश्न सोडविण्यासाठी पालीका स्तरावरून गुड मॉर्निग पथकाव्दारे शहरात पहाटेच्या सुमारास ठिकठिकाणी भेटी देवून उघड्यावर प्रातःविधी करणार्यांना अपमानित केले जात आहे. मात्र पालिकेच्या बहुतेक कर्मचार्याकडे व्यक्तीक शौचालय नसतांना स्वतः उघड्यावर शौचास बसतांना दिसत आहे. लोकांसांगे ब्रम्हज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण या म्हणीप्रमाणे वागत असल्याच्या चर्चा चौकाचौकात नागरीकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अगोदर कर्मचार्यांनी शौचालयाची सक्ती करण्याची आवश्यकता आहे.