यात्रोत्सवात उमडली गर्दी

0

भुसावळ । तालुक्यातील तापी नदीकिनारी असलेल्या कंडारी येथील कपिलेश्‍वर महादेव मंदिराचा यात्रोत्सव शनिवार 14 रोजी मकर संक्रांतीच्या पर्वावर मोठ्या उत्साहात पार पडला. तालुक्यासह जिल्हाभरातून आलेल्या महिला व पुरुष भाविकांनी महादेवाचे दर्शन घेवून आपल्या मनोकामना व्यक्त करुन महादेवाला साकडे घातले. भाविकांनी हर.. हर. महादेवचा जयघोष केल्याने संपुर्ण परिसर दुमदुमून निघाला. पोलीस पाटील रामा तायडे यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात येऊन यात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मंदिराचे विश्‍वस्त मुरलीधर जेठवे, काशिनाथ महाजन, ग्रामपंचायत सदस्य हर्षल नारखेडे, सुनिल चौधरी यांची उपस्थिती होती. पुरोहित अतुल देशपांडे यांनी मंत्रोपचार केले. यात्रोत्सवादरम्यान या ठिकाणी एक दिवसात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते त्यामुळे राज्यातील किरकोळ व्यापारी, व्यावसायिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.

ब्रह्ममुहूर्तापासून मंदिरावर लागल्या रांगा
यात्रोत्सवानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण दिसून आले. मंदिराच्या परिसरात नदीकाठी लहान मुलांसाठी खेळणी, महिलांसाठी गृहपयोगी वस्तूंसह धार्मिक साहित्य विक्रीची विविध दुकाने थाटण्यात आलेली होती. यात्रेकरी भाविकांच्या मनोरंजनासाठी मोठ मोठी आकाश पाळणे देखील उभारण्यात आले होते. संक्रांतीच्या पुण्यकाळात सकाळच्या ब्रह्ममुहूर्तापासूनच दर्शन घेण्यासाठी परिसरातील व बाहेरगावाहून मंडळी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आलेली होती. यात्रेकरुंनी मोठ मोठ्या आकाश पाळण्यांमध्ये बसण्यासाठी एकच गर्दी केलेली होती.

विश्‍वस्त मंडळाचे सहकार्य
संक्रांतीनिमित्त गावातील राजपूतवाडा, महाजन वाडा व कोळीवाड्यामधून समाजबांधवांनी मानपूजा घेवून गावातील विठ्ठल मंदिर, बेहरमबुआ, हनुमान मंदिर, ऐस देव, वाल्मिक मंदिर, सप्तश्रृंगी मंदिर, कपिलेश्‍वर महादेव येथे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करुन सोबत आणलेली पूजा व भगवा ध्वज चढविण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे येणार्‍या भाविकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सर्व जाती धर्मातील नागरिकांनी यात सहभाग घेतला. यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाचे सचिव काशिनाथ महाजन, मुरलीधर जेठवे, धनसिंग जेठवे व सहकारी तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले.

पोलिसांनी राखला बंदोबस्त
मकर संक्रातीनिमित्त दरवर्षी होणार्‍या यात्राोत्सवासाठी मंदीर प्रशासन व ग्रामस्थांकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. यात्रेदरम्यान अनुचित प्रकार रोखून यात्रा शांततेत पार पडण्यासाठी मंदीर प्रशासनासह भुसावळ शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी यावेळी कडक बंदोबस्त ठेवला. मकर संक्रातीच्या शुभ मुहुर्तावर रात्री 12 वाजेपासूनच या मंदिरात दर्शनासाठी गर्दी उसळली होती. परिसरातील नागरिकांनी सकाळी तापीपात्रात आंघोळ करुन  महादेवाचे दर्शन घेतले.