– एका अल्पवयीन मुलासह 5 जणांना अटक
धुळे : धुळे शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या घरफोडीच्या तसेच चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाला यश आले आहे. त्यांनी केवळ गुन्हेगारच शोधून काढले नाही तर या गुन्ह्यातील ऐवजही हस्तगत केला आहे. या पथकाने एका अल्पवयीन मुलासह 5 जणांना अटक,सोन्या-चांदीचे लाखोंचे दागिने हस्तगत चौघांना ताब्यात घेतले आहे. शिवाय चोरीच्या गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने घेणार्या चाळीसगावच्या सराफाला हुडकून त्याच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला आहे. हा ऐवज लाखोंच्या घरात आहे.
धुळे शहरासह आझादनगर आणि देवपूर भागात चोरीच्या घटना घडल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक चैतन्या एस.,अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी संबंधीतांना सूचना देवून या गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांच्या विशेष पथकाने गुन्हेगार आणि टोळ्यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी गुप्त बातमीदार नेमून माहिती घेतली जात होती. अशाच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या पथकाने मोहाडी उपनगरातील एका अल्पवयीन युवकास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता धुळे शहरासह आझादनगर व देवपूर पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या विविध चोरींची कबूली त्याने दिली. यात अन्य चौघांचा सहभाग असल्याचे या बालकाने सांगीतल्याने पोलीसांनी सदर बालकासह चारही जणांना ताब्यात घेतले. या टोळक्याने धुळे शहरात केलेल्या चार घरफोड्यांसह आझादनगर परिसरातील तीन घरफोड्या आणि देवपूरातील एका चोरीच्या घटनेची कबूली दिली. शिवाय चोरलेल्या सोन्या-चांदीचे दागिने त्यांनी चाळीसगाव येथील एका सराफास विकल्याचेही सांगीतल्याने पोलीस पथकाने चाळीसगाव येथे जावून सदर सराफाकडून ते दागिने हस्तगत केले. यात 250 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2050 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 7लाख 26 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त केला.
दरम्यान, अटकेत असलेल्या आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने या आरोपींना धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या भादंवि 454,457,380 अन्वयेच्या गुन्ह्यात वर्ग करुन शहर पोलिसांना सोपविले आहे. तेथेही या चोरट्यांनी एस.टी.महामंडळाच्या बसेसमधून चोरलेल्या बॅटर्यांसह चाळीसगाव रोड, मालेगाव रोडवर झालेल्या दुकानफोडीतील बॅटर्या, इन्व्हर्टर, ऑईलचे डबे, स्पेअरपार्ट आदी चोरल्याचे कबूली दिली आहे. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक चैतन्या एस.,अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांच्या विशेष पथकातील देवपूरचे पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे,सहाय्यक उपनिरीक्षक घनश्याम मोरे, सहा.उपनिरीक्षक फरीद शेख, पो.ना.मोहम्मद,मोबीन, पंकज चव्हाण, सुनिल पाथरवट, पो.कॉ.कबीर शेख, दिनेश परदेशी,निलेश महाजन, पंकज खैरमोडे,किरण सावळे यांच्या पथकाने केली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक चैतन्या एस. यांनी या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचे कौतूक केले असून त्यांना रोख बक्षिस देण्याचेही जाहीर केले आहे.