नवापूरचे पाणी प्रकरण पेटले; शिवसेनेने दिला इशारा
नवापूर : रंगावली नदी पाञात सोडले जाणारे गटारीचे दुषित पाणी त्वरित बंद करून उपाययोजना करावी अशी मागणी नवापूर शिवसेनेने केली आहे. तहसीलदार प्रमोद वसावे यांची भेट घेऊन या प्रकरणाची चर्चा करून निवेदन सादर केले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नवापूर शहराला पाणीपुरवठा करणारे एकमेव स्रोत रंगावली नदी आहे. या नदीवर मरीमाता मंदिराजवळ केटीवेअर बंधारा बांधण्यात आला आहे. यातुनच नवापूर शहरातील सुमारे 50 हजारावर लोकांना दैनंदिन पाणीपुरवठा होत असतो. शहरातील लाखाणी पार्क या नागरी वसाहतीतून मोठ्या प्रमाणावर गटारीचे दुषित पाणी सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या पालिकेने नदी पाञात सोडले जाणारे दुषित पाणी बंद न केल्यास शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला. गटारीचे नदी पाञात सोडण्यात येणारे दुषित पाणी तात्काळ रोखण्यात यावे व आवश्यक असलेली कायम स्वरूपी उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. निवेदन देते वेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील, शहर प्रमुख गोविंद मोरे, उपशहर प्रमुख अनिल वारूडे, उपतालुका प्रमुख राजेश जयस्वाल, उपशहर प्रमुख प्रविण ब्रम्हे, दर्पण पाटील, युवासेना शहर प्रमुख राहुल टिभे, शिवदास देसाई, अनिल पाटील आदी उपस्थित होते.