पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – पिंपळे गुरव येथे अनधिकृत बांधकाम कारवाई दरम्यान मंगळवारी (दि. 23) देवीबाई तुळशीराम पवार या महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. देवीबाईच्या मृत्यूला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत विश्वगोरा बंजारा सेवासंघाने देवीबाईचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. अखेर पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी तब्बल 36 तासांनी मृतदेह ताब्यात घेतला.
बांधकामे हटाववेळची दुर्घटना
पिंपळे गुरव येथे मंगळवारी सकाळी अनधिकृत बांधकाम कारवाई दरम्यान देवीबाई तुळशीराम पवार या महिलेने आपल्या घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली होती. औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान देवीबाईच्या मृत्यूला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी तसेच विश्वगोरा बंजारा सेवासंघाच्या सदस्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.
नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन
पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना निवेदन देऊन त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी आज मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित कुटुंबाला योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिल्याचे विश्वगोरा बंजारा सेवासंघाचे अध्यक्ष युवराज आडे यांनी सांगितले. देवीबाई पवार हिच्यावर पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीत बुधवारी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
इमारत अनधिकृतच
महापालिका प्रशासनाने त्यांची बाजू मांडताना संबंधित इमारत ही अनधिकृत होती. त्यांना तशी नोटीसही देण्यात आली होती. बांधकाम सुरू असतानाच दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. मात्र, तरीही इमारत बांधण्यात आली. शिवाय कारवाई वेळी प्रशासनाने नियमानुसार इमारतीमधील लोकांना खाली येण्याची विनंती केली होती. हे सर्व काम कॅमेरामध्ये रेकॉर्ड करुन घेतले आहे. उलट सरकारी कामात अडथळा आणत स्थानिक नागरिकांनी यंत्रणेवर दगडफेक केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बंजारा समाज रात्रभर रुग्णालयाबाहेर
घटनेनंतर नातेवाईकांनी हा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, मृतदेह कुजण्याची शक्यता असल्यामुळे नातेवाईकांच्या संमतीने मृतदेह शवविच्छेदनास नेण्यात आला. मात्र, शवविच्छेदनानंतरही नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच औंध जिल्हा रुग्णालयात बंजारा समाजाचे 500 ते 600 लोक बसूनच होता. मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
मृतदेहाचेही राजकारण
या घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न अनेकांचा सुरू होता. काहींनी आंदोलनाची तयार करत मृतदेह महापालिका दारात आणून ठेवूया असेही सुचविले. तसेच बांधकामे करताना अधिकार्यांनी त्याचवेळी का रोखली नाहीत? बांधकाम पाडण्यापूर्वी एकही नोटीस न देता थेट कारवाईच केली जात आहे. कुटूंबांना घरातून ओढून बाहेर काढत रस्त्यावर फेकले. देवीबाईलाही अधिकार्यांनी जिन्यावरून फरफटत नेत चौथ्या मजल्यावरून ढकलून देत तिचा खूनच केला, असे आरोप यावेळी केले जात होते. यातून राजकीय लाभ उठविण्यासाठी काहीजण आले होते. ही मंडळी नागरिकांना भडकावत होती. तसेच या आत्महत्त्येनंतर कारवाई थांबून आपली घरे वाचावीत या हेतूनेही घटनास्थळी गर्दीने येत दबाब टाकण्याचा प्रयत्न करत होते. अखेरीस महिलेच्या घरच्याच लोकांनी समजुतीने घेत मृतदेह स्विकारण्याचा निर्णय घेतला. हा निर्णयही अनेकांना न पटल्याने त्यांनी काढता पाय घेतला.