36 हजार रुपये लंपास

0

हिंजवडी : वर्कशॉपमधील कॅशियरच्या डोळ्यादेखत हातचलाखी करत 786 नंबर असलेली दोन हजार रुपयांची नोट घेण्याच्या बहाण्याने एका बहाद्दराने 36 हजार रुपये लंपास केले. हा प्रकार सोमवारी टोयोटा वर्कशॉपमध्ये घडला. विशाल प्रकाश भालगरे (वय 21) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल टोयोटा कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये कॅशियर म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास एक अनोळखी इसम वर्कशॉपमध्ये आला.

विशाल यांचे दैनंदिन काम सुरु होते. अनोळखी इसमाने विशाल यांच्याकडे दोन हजार रुपयांची दुसरी नोट मागितली. त्यावेळी विशाल यांनी एक दोन हजारांच्या नोटांचा बंडल बाहेर काढला. आरोपीने नोटांचा बंडल हातामध्ये घेऊन बंडल मधून 786 नंबर असलेली नोट मी काढून घेतो, असे सांगून नोटा पाहू लागला. नोटा बघत असताना आरोपीने दोन हजार रुपयांच्या तब्बल 18 नोटा असे एकूण 36 हजार रुपये चोरले. आरोपी सर्व्हिस सेंटरच्या बाहेर पडल्यानंतर काही वेळाने हा प्रकार विशाल यांच्या लक्षात आला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. एन. निकम तपास करीत आहेत.