स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव : एका दिवसात 2 हजार जणांची तपासणी
पुणे । शहरात स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. जानेवारी महिन्यापासून एचवनएनवनचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. या रुग्णांची संख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शनिवारी 2 हजार 873 संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यांपैकी 166 संशयीतांना टॅमी फ्लू देण्यात आले आहे. तर 63 रुग्णांची परिस्थिती अत्यावस्थ असून त्यातील 36 रुग्णांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या
पावसाचे दिवस असल्याने किरकोळ ताप आल्यास ताप अंगावर न काढता त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करण्याचा सल्ला महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. रविवारी 115 संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोघांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत.
रुग्णालये हाऊसफुल्ल
शहरात स्वाईन फ्लूचाचा फैलाव वाढत चालला आहे. पावसाळी वातावरण स्वाइन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक ठरत असल्याने रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जानेवारी महिन्यापासून 507 रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले आहे. तसेच 80 हून अधिक रुग्णांचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे. खाजगी व सार्वजनिक रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. सध्या 36 रुग्णांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
माहिती देण्यास टाळाटाळ
पालिकेच्या आरोग्यविभातर्फे स्वाइन फ्लूची माहिती देण्यासाठी नियमित अहवाल पाठवण्यात येतो. मात्र त्या अहवालात फ्लूमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची आकडेवारी व माहिती सध्या देण्यात येत नाही आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.