जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार व पाचशे रूपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा 8 नोव्हेंबर रोजी केली होती. यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडून गेली होती. तसेच हजार व पाचशेच्या नोटाद्वारा पेट्रोल पंपावर व्यवहार करण्याची सूचना देण्यात आली होती. यासोबतच शासकीय भरणा देखील जुन्या नोटांद्वारा स्विकारण्यात आला. नोट बंदीमुळे शासकीय कार्यालयांमध्ये थकीत कर भरणा झाल्याने त्यांना चांगले दिवस आले आहेत. पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर शहरात नागरिकांच्या एटीएमसमोर पैसे काढण्यासाठी रांगांच रांग लागयला सुरूवात केली होती. नागरिकांनी गर्दी वाढल्याने शहरातील एटीएम लवकरच कॅशलेस झाले आहे.
तीन दिवसानंतर समस्या ‘जैसे थे’
नोटाबंदीच्या घोषणेनंतर दोन हजारांची नोटा उपलब्ध करून देण्यात आली होती. पाचशे व हजाराच्या नोटा केंद्र सरकारने चलनातून बाद केल्यानंतर पैशांची समस्या निर्माण झाली असून ती अद्यापही सुटलेली नाही. त्यातच शनिवार पासून बँकांना सलग तीन दिवस सुट्टी असल्याने समस्या अधिकच वाढली. सलग तीन दिवसाच्या विश्रांती नंतर बँक मंगळवारी पुन्हा सुरु झाल्यानंतर दुसर्या दिवशी बुधवारी देखील बँकांमध्ये गर्दी दिसून येत आहे. सकाळ पासूनच तरूणांसह वृध्दांची बँकासमोर पुन्हा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बँकांना सुट्टी असल्याने नागरिकांना पैसे काढण्याची अडचण होत होती. मध्यंतरी बँका सलग सुरु होत्या. त्यामुळे पैशांची समस्या काही प्रमाणात कमी जाणवत होत्या. त्यातच तीन दिवस बँका सलग बंद असल्याने पुन्हा तशीच स्थिती निर्माण झाली होती.
एका तासात कॅश संपली
तांत्रिक कारणास्तव एटीएम बंद हा फलक प्रामुख्याने एचडीएफसी, आयडीबीआय, आयसीआयसीआय बँकांच्यामध्ये पहावयास मिळत होता. तर सेंट्रल बँकेच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शाखेमधील एटीएम नोटाबंदीनंतर अजूनही बंद स्वरूपात दिसून येत असल्यामुळे येथील विद्यार्थ्यी, शिक्षक व इतर कर्मचार्यांना पैशांसाठी शहरात यावे लागत आहे. बुधवारी सेंट्रल बँकेच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शाखेत पैसे काढण्यासाठी गर्दी झाली होती. परंतु, एका तासातच पैसे संपल्याने नागरिकांना खाली हात परतावे लागले. विद्यापाठ परिसरात मुला-मुलींचे वसतिगृह आहे तसेच कर्मचार्यांची वसाहत आहे. वसितगृहातील विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे असून देखील पैसे मिळत नसल्याने आर्थिक चणचण विनाकारण सहन करावी लागत आहे.
बहुतांश एटीएम बंदच
नोटा बंदीच्या निर्णयाला आता एक महिना पेक्षा अधिक कालावधी पुर्ण झाले असून अद्यापही शहरातील बहूतांश एटीएम मशिन ह्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे एटीएम ‘चोवी तास’ सुरु नसून ‘चोवीस तास’ बंदच आहे. परिणामी एटीएमच्या शोधात फिरणार्यांना रिकाम्या हातीच परतावे लागत असल्याने नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. शहरात स्टेट बँक आणि इतर मोजक्या बँकेच्या एटीएम वगळता इतर सर्व एटीएम मध्ये ठणठणात असल्याने बंद अवस्थेत होत्या. त्यामुळे निवडक एटीएम मशिनवरील बोझा वाढल्याने पैसे काढण्यास अधिकचा वेळ लागत आहे. तर काही एटीएममध्ये पैसे काढत असतांनाच तांत्रिक अडचणी येत आहे.
स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत गर्दी
स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वंतत्र रांग तयार करण्यात आलेली आहे. अपंगव्यक्ती व सरकारी भरणासाठी स्वंतत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच काही गरजूंना विशेष ट्रीटमेंट दिली जात आहे. बुधवारी एका गरोदर महिलेस कोणत्याही रांगेत उभे राहू न देता थेट काऊंटरवर पाठवून पैसे देण्यात आले. तसेच एका व्हीलचेअरवर आलेल्या ज्येष्ठ नागरिकाला कोणत्याही रांगेत उभे न करात थेट बँकेत प्रवेश देण्यात आला. स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत 15 काऊंटर बनविण्यात आलेले आहेत. तर 6 कर्मचारी बॅक ऑफीसला काम करीत आहेत.
कोट
मोदी यांनी घेतलेला नोटा बंदीचा निर्णय स्वागतार्ह असून त्यांच्या निर्णयाने देशातील काळा पैसा समाप्त होण्यास मदत मिळणार आहे. काही एटीएम बंद असले तरी होणार त्रास हा थोड्या दिवसांसाठी असून यातून चांगलेच बाहेर येणार आहे. माझा मोदींना पूर्ण पाठिंबा आहे.
– विलास शिवराम पवार, नागरीकबँकेतून पैसे काढण्यासाठी रांगेत दिड दोन तास लागत आहेत. नोटाबंदीच्या 36 दिवसानंतर देखील बँकामधील गर्दी कमी झालेले नाही. बँकांमधील गर्दी कमी होत नसली तरी मोदी सरकाने घेतलेली निर्णय हा चांगला आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे. याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी असे धाडसी पावूल उचलेले नव्हते.
– दत्तात्रय गणपत वाडकर, व्यवसायिक
मनोज नाईक विद्यार्थी
विद्यापीठ आवारात असलेल्या एटीएम मशिनमध्ये गेल्या महिन्या भरापासून रोकड उपलब्ध नसल्याने ती बंद अवस्थेत पडली आहे. त्यामुळे आम्हाला परिक्षेच्या कालावधीत देखील पैसे काढण्यासाठी आभ्यास सोडून पैसे काढण्यासाठी जळगाव शहरात जावे लागत असल्याने आमचा वेळ वाया जात आहे.
अनिल राठोड विद्यार्थी
विद्यापीठ परिसरात दोन एटीएम आहे परंतु त्यांचा काहीही उपयोग आम्हाला नोटाबंदीच्या काळात झालेला नाही. आम्ही विद्यार्थी असून घरच्यांनी पाठविलेले पैसे काढण्यासाठी विद्यापीठ परिसरात कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे आमच्याकडे पैसे काढण्याचा कोणताही पर्याय नसतो. शेवटी नाइलाजास्तव राष्ट्रीय महामार्गावरील धोकेदायक प्रवास करुन आम्हाला शहरात जावे लागते.