जळगाव । इसिस हे सोशल मीडीयाचा वापर करुन भारतीय तरुणांना आमिष देण्याचे काम करीत आहे. यासाठी त्यांची 5 हजाराच्यावर दलाल सक्रिय आहेत. सुरवातीला एखाद्याचा सुंदर चेहरा समोर आणून तरुणांशी ते संपर्कात येतात. यातुनच ते मानवतेचा खून करण्याचे दहशतवादी कारवाईचे सल्ले देतात. त्यामूळे तरुणांनी या सुंदर चेहर्यांना बळी न पडता त्यामागे लपलेला सैतान ओळखून त्यापासून दुर राहणे आवश्यक आहे. अशा विकृतांपासून सावध राहिल्यास सामाजिक संतुलन राखण्यास मदत होईल असे प्रतिपादन डॉ. अब्दुल रहेमान अंजरिया यांनी केले.
जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजीत दहशतावाद विरोधी व राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अप्पर पोलीस अधिक्षका मोक्षदा पाटील, निलोत्पन उपस्थित होते. डॉ. अंजरिया पुढे बोलतांना म्हणाले की, ईस्लामाच्या शिकवणीमध्ये दया, प्रेम, शांतता, दुसर्याबद्दल आदरभाव शिकविला जातो. मात्र इसिसमधील काही स्वतःला खलिफे समजून धर्माबद्दल चुकीची माहिती पसरवून तरुणांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे डॉ. अंजरिया यांनी सांगितले. दहशतवादाकडे तरुणांनी वळावे यासाठी त्यांच्यासमोर धर्माचा चुकीचा प्रचार केला जातो. त्यामूळे तरुणांनी या आमिषाला बळी न पाळता धर्म ओळखण्याची गरज आहे. एखाद्या खलिफाचे काम हे आपल्या जमीनचे आपल्या प्रजेचे संरक्षण करणे असते. मात्र दहशवादी हे निष्पाप जनतेवर अन्याय अत्याचार करतात. त्यामूळे ते स्वतःला खलीफे कसे होवू शकतात असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थितांना केला. दहशतवाद म्हणजे माणुसकीचा खून केलेला धर्म आणि हा धर्म जो स्विकारतो तो कोणत्याही धर्माचा पुरस्कर्ता नसतो. याबाबत एक हजार धर्मगुरुनी फतवा काढला आहे.
फुट पाडण्याचा डाव
पाकिस्तानमध्ये अलिकडे झालेल्या सर्वेक्षणात 60 दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचे एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीवरुन समजल्याचे त्यांनी म्हटले. तसेच पाकिस्तानच्या दहशवादी प्रोत्साहन धोरणांमूळे जगात धर्माची बदनामी होत आहे. भारतात काश्मिर पुर्वीपासून आहे आणि तो भारताचा अविभाज्य घटक आहे. त्यामूळे पाकिस्ताने यामध्ये बोलण्याचे काम नसल्याची टिका डॉ. अंजरिया यांनी केली. भारतीय तरुणांमध्ये शेजारील देशांचा फुट पाडण्याचा डाव युवकांमध्ये असलेल्या एकजुटीमूळे कदापी शक्य होणार नसल्याचे डॉ. अंजरिया यांनी प्रतिपादन केले.