सोशल मीडियाच्या वापरास जवानांना बंदी

0

नवी दिल्ली । सोशल मीडियावर जवानांकडून व्हिडिओ ‘व्हायरल’ झाल्याने लष्करातील शिस्त अबाधित राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने काही निर्देश जारी केले असून, जवानांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जवानांनी थेट तक्रारी सांगाव्यात, असे आवाहन लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केल्यानंतर गृहमंत्रालयाने जवानांच्या सोशल मीडियावरील वापराला चाप लावला आहे.

जारी केलेत नवीन निर्देश
बीएसएफच्या तेज बहादूर यादव या जवानाने जवानांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याची व्यथा मांडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यावरून खळबळ उडाली आहे. या अनुषंगाने नव्याने जारी केलेल्या निर्देशांनुसार, कोणत्याही जवानाला विनापरवानगी छायाचित्र अथवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करता येणार नाही. एखाद्या जवानाला ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्रामवर छायाचित्र अथवा व्हिडीओ टाकायचा असेल, तर त्यास संबंधित दलाच्या महासंचालकांकडून परवानगी घ्यावी लागेल.

दोन्ही जवानांच्या पत्नींचा आरोप
बीएसएफ जवान तेज बहादूर यादव आणि यज्ञ प्रताप सिंह या दोघांच्या पत्नींनी आपल्या पतीचे बरेवाईट होऊ शकते अशी शंका व्यक्त केली आहे. यज्ञ प्रतापची पत्नी ऋचा म्हणाली, माझ्या पतीशी माझे बोलणे झाले. ते फोनवर बोलताना ते रडत होते. काहीही झाले तरी न्याय मिळाला पाहिजे, असे ते म्हणत होते. त्यांना काही झाले तर त्यास पूर्णपणे सरकार व अधिकारीच जबाबदार असतील असे ऋचा यांनी दिला.