37 वर्षांपूर्वींच्या 200 रुपयांच्या हिर्‍याला मिळाली 5.4 कोटींची किंमत

0

लंडन । पुढच्या काही वर्षांनी आपल्याला चांगले रिटर्न्स पाहिजे असतील तर आपण म्युचुअल फंड्स, एफ.डी अशांमध्ये गुंतवणुक करतो. यासाठी काही हजारो, लाखभर रुपये आपण गुंतवून ठेवतो. त्यावर आपल्याला अपेक्षित रक्कम मिळते. पण फक्त 200 रुपयांपर्यंतची गुंतवणूक करुन तुम्हाला कोणी 37 वर्षांनी कोट्यावधी रुपये देईल का ? पण कोणाचे नशीब कसे उजळेल सांगता येत नाही म्हणतात तेच खरे.

कोण आहे ही महिला ? तिने 200 रुपये नेमके कशात गुंतवले होते?, असे प्रश्‍न तुम्हाला पडले असतील. तर या महिलेने 80च्या दशकात एक अंगठी खरेदी केली होती. इंग्लंडमधील ही महिला रातोरात करोडो रुपयांची मालक बनली आहे. 37 वर्षांपूर्वी गुंतवलेल्या 200 रुपयांच्या बदल्यात तिला आता कोट्यावधी रुपये मिळाले आहेत.
खरंतर ही महिला त्या अंगठीला सर्वसाधारण अंगठीप्रमाणे रोज बोटात घालत होती. मात्र, त्या महिलेला किंचितही कल्पना नव्हती की तिने बोटात घातलेल्या अंगठीत खरा हिरा आहे आणि त्याची किंमत काही कोटी रुपये आहे. आपण घातलेल्या अंगठीतील हिरा खरा असल्याचे जेव्हा या महिलेला कळाल तेव्हा तिला काय करायच सुचत नव्हतं. या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी तिने थेट दागिन्यांचा लिलाव करणारी संस्था गाठली. त्यावेळी या 26.27 कॅरेटच्या हिर्‍याची बाजारभावाप्रमाणे किंमत जवळपास 2 कोटी ते 3 कोटी रुपये असल्याचे तिला समजलं. मात्र या हिर्‍याच्या खरेदीसाठी बोली लागली गेली त्यावेळी हिर्‍यासाठी 5.4 कोटींची बोली लागली.

दुर्मिळ हिर्‍याची लागली मोठी किंमत
हिरा दुर्मिळ असल्याने त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोली लागली असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. हिरा खरा असला तरी त्याला जुन्या पद्धतीने पैलू पाडण्यात आले होते. त्यामुळे तो खरा आहे की खोटा याचा अंदाज महिलेला इतकी वर्ष आला नाही. तसेच पॉलिश केला नसल्याने हिरा जसा चमकतो तसा हा हिरा चमकतही नव्हता.