मनोर । पालघरमध्ये रविवारी काँग्रेस भवन मैदानावर ठाणे जिल्हा श्रमिक झोपडपट्टी सुधार संघ व स्व. रतीलाल देवजी चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट, पालघर यांच्यातर्फे 37 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा ठीक 3:30 वाजता समारंभाच्या अध्यक्षा संगिता धोंडे व काँग्रेस तालुका अध्यक्ष केदार काळे यांच्या उपस्थितीत पार पडला. हा 33 वा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न वरील संघाकडून आयोजित केला असून 37 आदिवासी जोडप्यांना भेट वस्तू देऊन मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला.
यांनी घेतले परिश्रम
या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी वरराजांनी सफेद रंगाचे कपडे व वधूंनी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वर्हाडी मंडळी उपस्थित होते. दुपारच्या साडेतीन वाजल्याच्या शुभमुहूर्तावर मंगलाष्टके बोलून अग्नीच्या साक्षीने सप्तपदी फेरे घेऊन वधू-वरांना हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे विवाहाच्या बंधनामध्ये बांधण्यात आले. तद्नंतर उपस्थित मान्यवरांनी नव दाम्पत्यास शुभाशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अशोक चुरी, अनिता चुरी, संतोष चुरी व योगिता चुरी आदींनी परिश्रम घेतले.