37 हजार कामगारांचा कापला पगार

0

मुंबई । मुंबई महापालिकाने कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केल्यानंतर हजेरीनुसारच पगार काढला जाण्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. त्यामुळे कर्मचार्‍यांनी नोंदवलेल्या हजेरीनुसारच आता पगार काढले जात असून वेळेवर हजेरी न नोंदवणार्‍या कर्मचारी, कामगारांच्या पगारात काटछाट करण्यात आली आहे. ही काटछाट एक-दोन नव्हे तर तब्बल 37 हजार कामगारांच्या पगारात करण्यात आली आहे. पगारच कमी आल्यामुळे महापालिकेत कल्लोळ माजला आहे. बायोमेट्रिक हजेरीचा परिणाम मुंबई महापालिकेने बायोमेट्रिक हजेरी जुलै 2017पासून बंधनकारक केली आहे. त्यामुळे या बायोमेट्रिक हजेरीसाठी मुंबईतील विविध कार्यालयांमध्ये 3900 मशीन्स लावण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने 31 ऑक्टोबरला परिपत्रक जारी करून बायोमेट्रिक प्रणालीतील उपस्थितीनुसारच मासिक वेतनाची आकारणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्व प्रकारच्या रजा, बाहेरील कामे, उशिरा येणे, पगार थांबवणे आदी सर्व बाबींचा समावेश यामध्ये केला होता. परंतु, याबाबत 31 डिसेंबर 2017 पर्यंत सवलत देऊनही कर्मचार्‍यांकडून याची अंमलबजावणी झालेली नाही.

रक्कम कापलीदरम्यान, प्रशासनाने गेल्या महिन्यात नवीन परिपत्रक जारी करून मानव संसाधन प्रणालीत योग्य रीतीने ड्युटी अवर्स भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये कामाचा दिनांक व वेळ नोंदवण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, या कामाचे दिनांक व वेळ न नोंदवल्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या जो पगार मार्चमध्ये कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा झाला, त्यात काही रक्कम कापल्याचे आढळून आले. महापालिकेत 1 लाख कर्मचारी असून त्यापैकी सुमारे 37 हजार कामगार कर्मचार्‍यांच्या पगारातील रक्कम कापली गेल्याची माहिती आहे. वेळेआधी कार्यालय सोडणे, अर्ध्या दिवसाची रजा घेऊन त्याची नोंद न करणे, कामांचे तास व वेळ न नोंदवणे, यामुळे या कर्मचार्‍यांचे पगार कापल्याचे मानव संसाधन विभागाने स्पष्ट केले आहे. प्रत्येक विभागाने आठ दिवसांची ड्युटी या प्रणालीत समाविष्ट केल्यास त्याप्रमाणेच पगार काढले जाणार असून जे कोणी कर्मचारी अर्धा दिवस सुट्टी किंवा सवलत घेऊन लवकर निघून जातात, त्यांनी त्याबाबतची नोंद खातेप्रमुखांच्या परवानगीने करायला हवी. परंतु, या सर्व कामगारांच्या कामांचा दिनांक व वेळ यांची नोंद न केल्यामुळे पगाराची रक्कम कापली गेली आहे.

प्रशिक्षण घेणार्‍या शिक्षकांचाही कापला पगार
या सर्व कामगारांनी याबाबतची नोंद परत केल्यास कापलेली रक्कम देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही एचआर विभागाने स्पष्ट केले आहे. महापालिका शाळांमधील शिक्षकांना ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. परंतु या प्रशिक्षणाला गेलेल्या शिक्षकांचाही पगार कापण्यात आला आहे. जर अशाप्रकारे शिक्षक प्रशिक्षणासाठी गेल्यानंतरही त्यांचे पगार कापले जाणार असतील तर एकही शिक्षक यापुढे ब्रिटिश कौन्सिलच्या प्रशिक्षणाला जाणार नाही, असा निर्धार शिक्षकांनी केला आहे.